रेल्वे सल्लागार समितीची बैठक ; प्रवाशांच्या सुविधांकडे सदस्यांनी वेधल लक्ष
भुसावळ- भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाला सुरुवात झाली असून लवकरच काम पूर्ण होणार असून रावेर रेल्वे स्थानकाचाही लवकरच कायापालट होणार असून त्या संदर्भात ठेकेदाराला कंत्राट देण्यात आल्याची माहिती भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत दिली. बोदवड, सावदा, मलकापूर रेल्वे स्थानकांच्या कायापालटसाठी निधीची अडचण असून निधीची उपलब्धता होताच या स्थानकांचे स्वरूप बदलण्यात येईल, अशी ग्वाही प्रसंगी देण्यात आली. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी पहिलीच बैठक गुरूवारी दुपारी तीन वाजता डीआरएम कार्यालयात घेण्यात आली. सदस्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना लेखी उत्तरे देण्यात आली. प्रवाशांना भेडसावणार्या विविध समस्यांबाबत सदस्यांनी प्रश्न विचारले.
कॉर्ड लाईनवरील गाड्यांना भविष्यात मिळणार थांबे
भुसावळचे सदस्य अनिकेत पाटील यांनी भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणासह रावेर व बोदवड, मलकापूर, सावदा स्थानकाच्या सुशोभीकरणाबाबत प्रश्न विचारला होता तसेच कॉर्ड लाईनवरून अनेक गाड्या धावत असताना भुसावळात मात्र त्यांना थांबे नसल्याने प्रवाशांची अडचण असल्याचे निदर्शनास आणून दिले. भुसावळ प्लॅटफार्मची अडचण असल्याने लवकरच प्लॅटफार्म होवून ही समस्या सुटेल, असे आश्वासन देण्यात आले तसेच सदस्य राजेश झवर यांनी 22118 व 22119 अमरावती एक्स्प्रेसला एसी बोगी लावण्याची तसेच भुसावळ-नागपूर पॅसेंजर स्लीपर डबे जोडण्याची मागणी केली होती. हा प्रश्न रेल्वे बोर्डाकडे पाठवून जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, रावेर रेल्वे स्थानकाच्या कामाचे कंत्राट देण्यात आले असून लवकरच कामाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले. रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी सुरूवातीला परिचय होऊन उपस्थित अधिकार्यांनी सुध्दा परीचय करून दिला. वरीष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी प्रास्तावीक केले. डीआरएम आर.के. यादव यांनी सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देत काही संबंधित अधिकार्यांनी सुध्दा त्यांच्या विभागाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे दिलीत.
या सदस्यांची बैठकीला उपस्थिती
भुसावळचे अनिकेत पाटील, राजेश झंवर, अकोला येथील वसंत बाछुका, पाचोरा येथील प्राचार्य डी.एफ.पाटील, खंडवा येथील मनोज कुमार सोनी, अकोला येथील ज्ञानप्रकाश खंडेलवाल, धुळ्याचे नितीन बंग, जळगाव येथील ललित बर्डीया, मलकापूरचे महेद्रकुमार बुरड, नेपानगरचे रवी मलानी, बुलढाण्याचे विनय बाफना यांनी लेखी प्रश्न विचारले होते. त्यांना रेल्वे प्रशासनाकडून लेखी उत्तर देण्यात आले.