भुसावळ। येथील रेल्वे स्थानकातील मुसाफिर खान्यावरील पत्रे जीर्ण झाली होती. यामुळे पावसाळा आणि उन्हाळ्यात प्रवाशांचा त्रास वाढला होता. ही जीर्ण पत्रे बदलवण्याचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. विशेष म्हणजे हे काम करताना ’रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा उपक्रम राबवला जाणार आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यात या प्रयोगाद्वारे सुमारे 60 हजार लिटर पाणी जमिनीत जिरवले जाईल.
विभागातील स्थानकावरही राबविणार उपक्रम
भुसावळ जंक्शनवर येणार्या प्रवाशांसाठी मुसाफिरखाना तयार केला आहे. या मुसाफिरखान्यावरील पत्रे जीर्ण झाली होती. यामुळे रेल्वे प्रशासनाने जीर्ण पत्रे बदलवून नवीन पारदर्शक पत्रे टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काम सुरु करण्यात आले. सोबतच या पत्रांवर संकलित होणारे पावसाचे पाणी रेल्वेच्या लोको पायलट रनिंगरुमजवळील कूपनलिकेत सोडण्यात येईल. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या या प्रयोगाद्वारे पावसाळ्याच्या चार महिन्यात एकूण 60 हजार लिटर पाणी जमीनीत जिरवण्यात येईल. यासाठी छतावरील पत्रांपासून ते कूपनलिकेपर्यंत स्वतंत्र पाईपजोडणी केलेली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास तो विभागातील अन्य रेल्वे स्थानकांवर राबवण्यात येईल, यामुळे काही प्रमाणात का होईना भुजलपातळीत नक्कीच वाढ होईल.