जंक्शनवर संशयास्पद बॅग सापडताच यंत्रणेचा चुकला ठोका ; दिड तास प्रवाशांचा थरकाप अन मॉकड्रील कळताच जीव पडला भांड्यात
भुसावळ : रेल्वे स्थानकांना दशहतवाद्यांपासून नेहमीच असलेला धोका पाहता सुरक्षा यंत्रणा नेहमीच डोळ्यात तेल घालून तैनात राहतात मात्र गुरुवारी भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक दोनवर एक बॅग बेवारस असल्याची माहिती यंत्रणेला मिळताच खळबळ उडाली तर बॅगेत बॉम्बसदृश वस्तू नसावी ना ? या विचारांमुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली. लोहमार्ग पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बल व स्थानिक बाजारपेठ पोलिसांनी तातडीने रेल्वे स्थानकावर धाव घेतली तर जळगावच्या बीडीडीएस टीमसह रेल्वे सुरक्षा बलाच्या श्वान पथकालाही पाचारण करून जागा निर्मनुष्य करण्यात आली. बीडीडीएस पथकाने खबरदारी घेत बॅगेचे अॅन्टी हॅण्डलिंग करीत आरओव्ही पद्धत्तीने निकामी केले तर अखेरच्या क्षणी सतर्कतेसाठी हे मॉकड्रील असल्याचे कळताच यंत्रणेच्या जीव भांड्यात पडला.
प्रवाशांनी घेतला सुटकेचा श्वास
गुरुवारी सकाळी 10.30 ते दुपारी 12.10 वाजेपर्यंत चाललेल्या या प्रक्रियेनंतर अखेरच्या क्षणी यंत्रणेची दक्षता तपासणीसाठी मॉक ड्रील असल्याचे कळताच प्रवाशांसाठी सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला. मॉकड्रीलमुळे रेल्वेच्या वाहतुकीवर कुठलाही प्रभाव पडला नाही तर प्रवाशांमध्ये भीती निर्माण होवू न देता यंत्रणेने सतर्कता बाळगली.
यांची होती उपस्थिती
लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, गुप्तवार्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त अमितकुमार मनेळ, लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेर्डे, आरपीएफ निरीक्षक आर.के.मीना, भुसावळ शहर व बाजारपेठचे कर्मचारी, अधिकारी तसेच जळगाव बीडीडीएसचे पथक व अग्शिमन दल भुसावळचे कर्मचारी उपस्थित होते.