भुसावळ। जंक्शन रेल्वे स्थानक चोरट्यांचे आश्रयस्थान ठरत आहे. गेल्या तीन दिवसात तीन गाड्यांमधून प्रवाशांच्या मोबाईलची चोरी झाल्याने सुरक्षा यंत्रणांची गस्त नावालाच असल्याची टीका प्रवाशांमधून होत आहे. भुसावळ आले, मोबाईल सांभाळा, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. वाढत्या चोर्या रोखण्यात सुरक्षा यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्या आहेत.
सैराट चोरट्यांना पकडण्यात सोर्स कुचकामी
23 रोजी कल्याण ते नागपूर प्रवास करणार्या प्रवाशाचा डाऊन सेवाग्राम एक्स्प्रेसमधून 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी कोच नं. तीनमधील बर्थ क्रमांक 57-58 वरुन लांबवला. दुसर्या घटनेत अकोला-दादर प्रवास करणार्या सुभाष महादेव डोंगरे (अकोला) या प्रवाशाचा अप अमरावती एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यातून 9 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. तिसर्या घटनेत 24 रोजी डाऊन महाराष्ट्र एक्स्प्रेसने प्रवास करणार्या रोहित पुखराज जमाईवार (शारदा नगर, गोंदिया) या प्रवाशाचा वातानुकूलित बोगी बी-1 मधून नऊ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला. याशिवाय 21 रोजी चहा पिण्यासाठी जंक्शन स्थानकावर उतरलेल्या संजयकुमार बाबुलाल गुप्ता (फैजाबाद) या प्रवाशाचे पाकीट चोरट्यांनी लांबवत सुरक्षा यंत्रणेलाच आव्हान दिले. पाकिटात 600 रुपये रोख अन्य महत्वाची कागदपत्रे होती. लोहमार्ग पोलिसात चारही घटनांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.