जंगलामध्ये वन्यप्राण्यांची शिकार करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

0

जामनेर पोलिसांनी कामगिरी ः दोन जणांना अटक, दोन फरार ः दोन बंदुका, 48 मोठे जिवंत राऊंड, एक चारचाकी वाहन,काळविट व निलगायीचे मांस जप्त

जळगाव : जंगलांमध्ये वन्यप्राण्यांची शिकार करणार्‍या टोळीचा जामनेर पोलिसांनी वनविभागाच्या मदतीने सोमवारी पहाटे पर्दाफाश केला आहे. या कारवाई पोलिसांनी महेमुद मोहम्मद अबीद (45) व अन्सारी सोद मोहमद अबीद (32 ) दोन्ही रा.धुळे या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन बंदुका, 48 मोठे जिवंत राऊंड, एक चारचाकी वाहन,काळविट व निलगायीचे मांस जप्त करण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान हर्षद ड्रायव्हर रा.अकबर चौक, धुळे व उस्मान शहा रा. नाचणखेडा ता.जामनेर हे पसार झाले असून त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. संशयितांच्या वाहनाचा पाठलाग करतांना पोलिसांचे वाहन उलटल्याने यात एक जखमी झाले आहे. अशापध्दतीने जीवाची बाजी लावून पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलीस मित्र, गावकर्‍यांची मदतीने संशयितांना घेराव

जामनेर तालुक्यातील नागनचौक जंगलात सोमवारी पहाटे पाच वाजता काही जण वाहने व बंदूका घेऊन नीलगाय व काळवीटची अवैधरित्या शिकार करीत करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना मिळाली. इंगळे यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, उपअधीक्षक ईश्वर कातकाडे यांना कळवून सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, उपनिरीक्षक विकास पाटील, सहायक फौजदार जयसिंग राठोड, ईस्माईल शेख, राहुल पाटील, सचिन पाटील,अमोल घुगे, प्रदीप पोळ यांना सोबत घेऊन तात्काळ नागनचौकी जंगल गाठले. वाडीकिल्ला येथील पोलीस मित्र विलास पाटील व गावकर्‍यांची मदत घेवून संशयितांना घेराव घातला.

संशयितांचा पाठलाग करताना पोलिसांचे वाहन उलटले

नागनचौकी जंगलात संशयितांना घेरल्यानंतर दोन जण वाहन सोडून जंगलात पळून जाण्यात यशस्वर झाले तर अन्य दोघं जणांनी चारकाचीतून (एम.एच.02 जे 9760) पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग केला असता ही चारचाकी रस्त्यात उलटली, त्यात अन्सारी सोद मोहमद अबीद याच्या डोक्याला मार लागल्याने तो जखमी झाला. त्याचा दुसरा साथीदार महेमुद मोहम्मद अबीद याला पकडण्यात आले. पलायन केलेल्यांची नावे हर्षद ड्रायव्हर रा.अकबर चौक, धुळे व उस्मान शहा रा.नाचणखेडा ता.जामनेर असे आहेत. या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील, कर्मचारी तुळशिराम नागोराव घरजाळे, अशोक ज्योतीराम सपकाळे हे देखील सहभागी झाले होते.याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सहायक धरमसिंग सुंदरडे करीत आहे.

असा जप्त केला मुद्देमाल

25 हजार रुपये किमतीची 22 मि.मि.रायफल (दुर्बिणीसह )
30 हजार रुपये किमतीची 306 मि.मि.रायफल ( दुर्बिणीसह )
दीड हजार रुपये किमतीचे 22 मि.मि.रायफलचे 22 जिवंत काडतुस व 11 खाली राऊंड
दोन हजार 600 रुपये किमतीचे -306 रायफलचे 13 जिवंत राऊंड व 2 खाली राऊंड
1 लाख 20 हजार रुपये किमतीची चारचाकी
7 हजार रुपये कंपनीचा मोबाईल
15 किलो 107 ग्रॅम वजनाचे एक काळवीट प्राण्याचे मांस
78 किलो 440 ग्रॅम वजनाचे निलगाय प्राण्याचे तुकडे ( दोन्ही मासांची किमंत 1,86,100/- रुपये )
एकुण मुद्देमाल – 3 लाख 45 हजार 200