जंगलेश्‍वर महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्साहात साजरी

0

मुंबई । देवादिदेव महादेव, शिवशंकर, भोलेनाथ यांचा महाशिवरात्र उत्सव घाटकोपरच्या प्रसिद्ध देवस्थान असलेल्या जंगलेश्‍वर महादेव मंदिरात मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. मुंबई उपनगरातील जंगलेश्‍वर महादेव मंदिर हे प्रसिद्ध असे धार्मिक स्थळ आहे. यंदा जंगलेश्‍वर भक्तमंडळ 49वे वर्ष साजरे करत आहे. महाशिवरात्र महोत्सवाचे प्रमुख कैलाश सदाशिव सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक यज्ञ व षोडशोपचार पूजा विधी करण्यात आली. यावेळी मंदिरात कुंडीय रुद्र यज्ञ आणि महामृत्युंजय जप करण्यात आला. या जंगलेश्‍वर महादेव मंदिराला मोठा इतिहास आहे. हे स्थान साधारण 170 वर्षांपूर्वी प्रगट झाले आहे. जंगलेश्‍वर महादेव मंदिराची आख्यायिका अशी सांगितली जाते की, साधुसंत नागा गोसावी यांना हे स्थान सापडले. त्यांच्या माध्यमातून येथे पूजाविधी सुरू झाली.

निसर्गरम्य डोंगराच्या पायथ्याशी शिवलिंगाची पूजा केली जात होती. नागा गोसावी स्थलांतरित झाले. कालांतराने राजकुमार लोयलका यांच्या जागेत असलेले हे देवस्थान छोटेसे मंदिर असताना शिवभक्त सदाशिव सुर्वे यांनी जंगलेश्‍वर महादेव मंदिराचा 1984 साली जीर्णोद्धार केला. मंदिराचे घुमट हे शिवलिंगकार स्वरूपात बांधलेले आहे. मंदिरातील महादेवांची उंच मूर्ती भक्तांना आकर्षित करते. हे मंदिर बांधल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. या मंदिरातील महादेवाचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्त दूरवरून येतात. महाशिवरात्रीला येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. महाशिवरात्रीला जमणार्‍या गर्दीच्या कारणास्तव साकीनाका पोलिसांनी येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला आहे.

मुंबईत इतरत्रही महाशिवरात्री उत्साहात साजरी!
मुंबईतील शहर आणि उपनगरातील ठिकठिकाणी असलेल्या शिवमंदिरांमध्येही मोठ्या उत्साहात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. विशेषतः बाबुलनाथ मंदिरात काल रात्रीपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. रांगेत उभे असलेल्या भक्तगण ‘बम बम भोले’चा घोष करत शिवाला आळवत होते. या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.