पुणे । पुणे महापालिकेच्या ताब्यात असलेल्या 4 जकात नाक्याच्या जागा बसस्थानक, वाहनतळ, बसडेपो यासाठी पीएमपीला 30 वर्षांसाठी देण्याचा प्रस्ताव सोमवारी मुख्य सभेत मंजुरी देण्यात अली. महापालिकेची जकात बंद झाल्यामुळे पालिकेच्या ताब्यातील शेवाळेवाडी, भेकराईनगर, शिंदेवाडी, भूगाव आणि बालेवाडी जकात नाक्यांच्या जागांची मागणी पीएमपी प्रशासनाने पालिकेकडे केली आहे. याठिकाणी बसस्थानके, बसडेपो आणि वाहनतळ उभारण्याचा पीएमपीचा प्रस्ताव होता.
त्याचबरोबर बीओटी अथवा पीपीपी तत्वार जागांचा विकास करण्यासाठी पीएमपीला संमती देण्यात यावी असा प्रस्ताव पीएमपीने महापालिकेला दिला होता. पीएमपीची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे कोणतेही भाडेआकारु नये अशी मागणी पीएमपी प्रशासनाने केली आहे. महापालिकेच्या 2008 च्या जागा वाटप नियमावलीनुसार पीएमपीला साडेचार कोटी भाडे द्यावे लागणार आहे. मात्र हे भाडे माफ करावे असा प्रस्ताव पीएमपीने दिला आहे. त्यामुळे महापालिकेने कोणतेही भाडे न आकारण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी हा प्रस्ताव मुख्यसभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.