पुणे । महापालिकेच्या जकात नाक्याच्या 4 जागा पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) 30 वर्षांसाठी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे. या जागेवर बसस्थानक, वाहनतळ, बसडेपो उभारण्यात येणार आहे.
जकात बंद झाल्यामुळे पालिकेच्या भेकराईनगर, शेवाळेवाडी, शिंदेवाडी, भूगाव आणि बालेवाडी जकात नाक्यांच्या जागांची मागणी पीएमपी प्रशासनाने पालिकेकडे केली आहे. याठिकाणी बसस्थानके, बसडेपो आणि वाहनतळ उभारण्याचा पीएमपीचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर बीओटी अथवा पीपीपी तत्वार जागांचा विकास करण्यासाठी पीएमपीला संमती देण्यात यावी, असा प्रस्ताव पीएमपीने दिला होता. तसेच पीएमपीची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे कोणतेही भाडे आकारु नये, अशी मागणी पीएमपी प्रशासनाने केली आहे.
साडेचार कोटी भाडे
महापालिकेच्या 2008 च्या जागा वाटप नियमावलीनुसार पीएमपीला साडेचार कोटी भाडे द्यावे लागणार आहे. मात्र हे भाडे माफ करावे असा प्रस्ताव पीएमपीने दिला आहे. त्यानुसार भेकराईनगर, शिंदेवाडी, शेवाळेवाडी, भूगाव या जागा काही अटींसह पीएमपीला देण्यासंबधीचा प्रस्ताव स्थायी समितीला आला आहे. या जागेंची आवश्यकता असल्यास महापालिकेला पीएमपीने परत कराव्यात, तसेच पालिका निश्चित करेल ती भाडेपट्ट्याची रक्कम आगाऊ जमा करावी. पीएमपीने उत्पन्न वाढीच्या दृष्टीने बीओटी अथवा पीपीपी तत्वावर प्रकल्प राबवायचा झाल्यास प्रकल्पाची मुदत आणि भाडेपट्ट्याची मुदत सारखीच असावी, अशा काही अटी प्रस्तावात देण्यात आल्या आहेत.