जळगाव: देवळाली ते भुसावळ शटलमधून प्रवास करताना पाचोरा येथील एक तरुण परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानकादरम्यान पोल नंबर ३८३ च्या जवळ पडून जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. या तरुणाचे प्राण वाचविण्यासाठी गार्ड व रेल्वे चालकांने चर्चा करून रेल्वे तब्बल दीड ते दोन किलोमीटर पर्यंत मागे नेत जखमी तरुणाला घेत जळगाव येथे आणले. जखमी तरुणाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरु असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार पाचोरा येथील एमआयडीसी कॉलोनीमध्ये राहणारा राहुल संजय पाटील हा तरुण शिक्षणासाठी दररोज पाचोरा ते जळगाव दरम्यान अपडाऊन करतो. आज सकाळी परधाडे रेल्वे स्थानकावरून गाडी निघाल्यानंतर या तरुणाचा तोल जाऊन तो खाली पडला. सहप्रवाशी आणि त्याच्या मित्रांनी तत्परता दाखवत साखळी ओढून गाडी थांबविली. तोपर्यंत गाडी दीड ते दोन किलोमीटर पर्यंत पुढे पोहोचली होती. त्याचे मित्र व सहप्रवाश्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, राहुल हा जखमी व रक्तबंबाळ अवस्थेत पडून होता. यावेळी अपलाईनवरून जाणारी मालगाडी तेथे थांबविण्यात आली, शटलचे गार्ड यांनी मालगाडी चालकाला त्याला पाचोरापर्यंत नेण्याची विनंती केली. मात्र त्याला जळगाव येथे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या तरुणाची मृत्यूशी झुंज सुरू असून त्याला वेळेत उपचार मिळाले तर तो वाचू शकेल असा मेसेज गाडी चालक दिनेश कुमार यांना देण्यात आला. त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता माणुसकीच्या नात्याने रेल्वे मागे घेतली. पुढील उपचारासाठी जळगाव येथे आणण्यात आले, यावेळी जळगाव स्थानकावर रुग्णवाहिका सज्ज होती. जखमीला तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. अनेक प्रवाश्यांनी आपल्या आयुष्यात पाहिल्यांदाच गाडी उलटी जात असल्याचे पहिले. रेल्वे प्रशासनाने जखमी व्यक्तीसाठी लागलीच गाडी पुन्हा मागे घेत माणुसकीची दाखविल्याची चर्चा रंगली होती.