नंदुरबार। पे ट्रोल टाकून जाळलेल्या वृध्द बिर्याणी विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची वार्ता शहरात येऊन धडकताच शास्त्रीमार्केट परिसरात तणाव निर्माण झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने आज शनिवार रोजी सकाळी दुकानांवर आणि घरांवर दगडफेक करीत जाळपोळ केली. या जमावाच्या दगडफेकीत पोलिसनिरिक्षकांसह 7 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. जाळपोळीचा प्रकार घडल्याने शहरात तणाव निर्माण झाला होता. जमावाने दगडफेक केल्याने बाजारपेठ बंद करण्यात आली. पोलीसांना मदतीसाठी सीआपीएफचे जवानांची तुकडी देखील दाखल झाली होती.
संवेदनशिल भागात शांतता
तथापि पोलिसांनी संपूर्ण बळ पणाला लावत अश्रूधुरांचा मोठ्याप्रमाणात वापर करीत स्थिती नियंत्रणात आणली. सुभाषचौकात असलेल्या पेट्रोलपंपावर देखील जमाव चालून आला होता. यावेळी पोलिस निरिक्षक मोहकर यांनी धाडस दाखवून जमावाला माघारी फिरण्यास भाग पाडले. शहरातील मध्यवर्ती भागात दंगल सदृष्य परीस्थिती निर्माण झाल्याने अफवांना उत आला होता. संवेदनशिल म्हणून ओळख असलेल्या माळीवाडा, काळीमशीद या परिसरात मात्र शांतता असल्याने पोलिसांनीही सुटकेचा निश्वास सोडला.
शहरात अघोषित संचारबंदी
अवघ्या दीड तासातच स्फोटक परीस्थिती नियंत्रणात आणल्याची कामगिरी पोलिसांनी केली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.राजेंद्र डहाळे जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी शहरात फिरुन परीस्थितीचा आढावा घेतला. या दंगलीच्या परीस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी एसआरपीच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. सायंकाळपर्यंत दोन्ही बाजूच्या 25 ते 30 हून अधिक जणांना अटक करण्यात आली. दरम्यान दंगली सुरूअसतांना प्रार्थनास्थळ आणि मंदिराच्या दिशेनेही दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तोंडाला रुमालबांधलेला जमाव पाहून अनेकांना काश्मिरमधील स्थितीचे स्मरण झाले. दहशतीमुळे सर्व शहर बंद पडून रस्ते सामसूम झाल्याने शहराला अघोषित संचारबंदीचे स्वरुप प्राप्त झाले होते.
पोलीसांचा चोख बंदोबस्त
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून सर्वत्र तणावपूर्ण शांतता पसरली आहे. रविवार 4 जूनच्या रात्री साडे अकरा वाजता नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केट भागात लॉरीवर चिकनटिक्का विकणार्या शब्बीर शेख मासूम पिंजारी (वय 75 वर्षे) यांच्याशी सचिन मराठे या युवकाचा वाद झाला होता. या वादातून संतप्त सचिनने शब्बीर यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटती शेगडी अंगावर ढकलली असता शब्बीर जखमी झाले होते. त्याचप्रसंगी सचिनवर सामुहिक हल्ला करीत संतप्त जमावाने बेदम मारहाण केल्याने सचिनही रुग्णालयात दाखल होेता.
शांततेचे आवाहन
शहरात शांतता राखण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षकांनी केले आहे. नंदुरबार शहरात विविध संवेदनशील भागात गस्ती पथकेही तैनात करण्यात आली आहेत. गस्ती पथके शहरभर फिरत असून अफवा पसरविणार्यांचा ते कसून शोध घेत आहेत. सोशल मीडीयाद्वारे काही समाजकंटक चुकीची माहिती प्रसारीत करु शकतात, त्याकडे लक्ष देऊ नका, असे संदेश फॉरवर्ड करु नका, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे. तसेच शहरातील विविध सामाजिक, राजकीय पक्षांनीही शांततेचे आवाहन केले. पोलिस ताफांवर दगडफेक करणार्यांवर सक्त कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
मृत्यूच्या बातमीने तणावात वाढ
सचिनविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान काल शुक्रवार 9 जून रोजी रात्री 11 वाजता सचिन हा उपचाराअंती बरा होऊन आला व त्याने जमावाविरुध्द फिर्याद देत गुन्हा नोंदवला. तर तिकडे मुंबईत उपचार चालू असतांना शब्बिर यांचा शुक्रवार 9 जूनच्या पहाटे मृत्यू झाल्याची बातमी येथे पोहोचली. यामुळे आज शनिवार 10 जून रोजी सकाळपासूनच शहराच्या मध्यवर्तीभागात तणाव वाढला. खबरदारी म्हणून पोलिसताफा त्या भागात लावण्यात आला. तरीही संतप्त जमावाने तुफान दगडफेक करीत दहशत निर्माण केली. घरांना आणि दुकानांना पेटवून देणे, सामानाची नासधूस करणे, वाहनांची नासधूस करणे असे प्रकार काही मिनिटात सोनारखुंट, शास्त्रीमार्केट, गणपतिमंदिर चौक, बालाजीवाडा रस्ता, जळकाबाजार, सुभाषचौक, मंगळबाजार, मारुती व्यायामशाळा, भतवाल थिएटर, अमृतचौक या सर्व ठिकाणी घडले.