जगज्जेते जर्मनी अंतिम फेरीत

0

सोची । जगज्जेत्या जर्मनीने दुसर्‍या उपांत्य फेरीत मेक्सिकोचा 4-1 असा फडशा पाडत कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आक्रमक मिडफिल्डर लेऑन गोर्तझ्काने सामन्याच्या सुरुवातीलाच दोन गोल करत जर्मनीच्या विजयाची पायाभरणी केली. त्यानंतर टिमो वेर्नर आणि बदली खेळाडू अमिन युनेसने दुसर्‍या हाफमध्ये गोल करत संघाला मोठा विजय मिळवून दिला. अंतिम सामन्यात जर्मनीसमोर चिलीचे आव्हान असणार आहे. स्पर्धेतील साखळी लढतींमध्ये या दोन संघांमधील लढत 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. पहिल्या हाफमध्ये 62 टक्के चेंडूचा ताबा मेक्सिकोच्या खेळाडूंकडे होता. यादरम्यान मेक्सिकोच्या खेळाडूंनी तब्बल दहावेळा जर्मनीच्या गोलोस्टवर धडक मारली. याउलट जर्मनीच्या आक्रमकानी पाच आक्रमक चाली रचून 2-0 अशी आघाडी घेतली. दुसर्‍या हाफमध्ये जर्मनीने आपला बचाव अभेद्य ठेवला.

मार्सिओचा अप्रतिम गोल
जर्मनीने हा सामना 4-1 अशा फरकाने जिंकला असला तरी मेक्सिकोचा एकमेव गोल करणार्‍या मार्सिओ फॅबिबीअनने फुटबॉलप्रेमींची मने जिंकली. सामन्यातील 89 व्या मिनिटाला मार्सिओनने सुमारे 35 मीटर अंतरावरून केलेला गोल अप्रतिम असा होता. त्याआधी गोर्तझ्काने 6 व्या आणि त्यानंतर वेर्नरने दिलेल्या छोट्या पासवर गोर्तझ्काने वैयक्तिक आणि संघासाठी दुसरा गोल नोंदवला. त्यानंतर दुसर्‍या हाफमध्ये वेर्नर आणि युनेसने प्रत्येकी एक गोल करत मेक्सिकोच्या खेळाडूंवरील दडपण वाढवले. 24 वर्षांखालील युवा खेळाडूंचा समावेश असलेला जर्मनी आणि चिली यांच्यातील अंतिम सामना सेंट पीटर्सबर्ग येथे होईल.

पुनरावृत्ती झालीच नाही
सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर पुन्हा मुसंडी मारणारा, कमबॅक किंग म्हणून मेक्सिकोचा संघ ओळखला जातो. साखळी लढतीतील न्यूझीलंड, रशिया आणि पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यात पिछाडीवर असतानाही मेक्सिकोने जोरदार कमबॅक केले होते. पण उपांत्य फेरीत मात्र त्यांना त्याची पुनरावृत्ती करता आली नाही.