जगण्याचा मूळ हेतूच विसरण्याचे हे एकवीसशे शतक

0

भुसावळ येथील कोटेचा व्याख्यानमालेत डॉ.रमा मराठे

भुुसावळ : एकविसाव्याला शतकाला विविध समस्यांनी वेढलेले आहे. माणूस तणावग्रस्त होत आहे. जग जवळ आले पण माणुस मात्र एकाकी होत आहे. नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. मुलांचा भावनिक बुध्दांक न वाढल्याने तेदेखील जीवनात विफल होत आहे. थोडक्यात जगण्याचा मूळ हेतूच विसरण्याचे हे एकवीसशे शतक आहे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ साहित्यिक व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रमा मराठे यांनी येथे व्यक्त केले. कोटेचा व्याख्यानमालेत ‘रंग सुखाचे’ या विषयावर त्यांनी पहिले पुष्प गुंफले.

जो समाजात राहतो तो सुखी होतो
डॉ.रमा मराठे म्हणाल्या की, यश, पैसा, अधिकार, शिक्षण, पुरस्कार, मानसन्मान केवळ अशा गोष्टी म्हणजे सुख नव्हे. सुख ही व्यापक संकल्पना आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे. जो समूहात राहतो तो सुखी होतो. भूतकाळातील दुःखद गोष्टी आठवण्यापेक्षा जे चांगले घडले ते आठवण्याचा प्रयत्न करा. वाईट काळातही स्वतः मधील गुण ओळखा स्वतःला विधायक किंवा क्रिएटिव्ह कामात गुंतवून घ्या. सुखी राहणे ही मानसिक सवय असून ती जबाबदारी आपली स्वतःचीच असते. आवडते ते मिळाले म्हणजे यश अन जे मिळाले ते आवडून घेणे म्हणजे सुख होय. दरम्यान, उद्योजक दीपेश कोटेचा, पद्मा कोटेचा, प्रकाश लाखरे, रत्ना लाखरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा. एस. एस. जैस्वाल यांनी सूत्रसंचालन अ‍ॅड.अजित गुप्ता यांनी आभार मानले.