‘समाजात वावरत असताना अनेक लोकं आपण पाहतो. रस्त्यांनी चालताना रोज हजारो लोकं आपल्याला क्रॉस होतात, आपल्या समोरून जातात. गर्दीत कुणी ओळखीचा दिसेल तरच आपण त्याच्याकडे बघतो, पाहून हसतो किंवा बोलतो. मात्र मी रस्त्याने चालताना प्रत्येक माणूस माझ्याकडे बघतो, हसतो आणि अनेकजण माझ्याशी कुतुहलाने बोलतात देखील. मी बुटका असल्यामुळे माझ्यावर प्रत्येक माणूस प्रेमच करतो. या प्रेमाच्या बळावर मी अनेकांपेक्षा मोठा होऊन गेल्याची भावना माझ्या मनात निर्माण होते.’ हे शब्द आहेत पांडुरंग राठोडचे. पांडुरंग, वय २२ वर्ष, उंची ३ फुट २ इंच. एम कॉमच्या पाहिल्या वर्षाला आहे. सध्या जळगावच्या दीपस्तंभ फाऊंडेशनच्या ‘मनोबल’ प्रकल्पामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय.
कसंय अपंग म्हटलं की, तो अपंग कसा आहे? का आहे? किती टक्के आहे? हे प्रश्न जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. अन मग ते जाणून घेतल्यावर त्याच्याबद्दल केवळ सहानुभूती व्यक्त करणारे लोकं भरपूर प्रमाणात भेटतात तर त्यांच्यासाठी प्रत्यक्ष काम करणारी लोकं कमी प्रमाणात. दिव्यांगांसाठी अशाच प्रकारे खरोखर कृतीशील काम करणारे यजुर्वेंद्र महाजन यांच्या संकल्पनेतून असाच एक प्रकल्प जळगावात उभारला गेला आहे. याच प्रकल्पात मला हा पांडुरंग भेटला. सुरवातीला त्याला बघितल्यावर मलाही इतरांसारखंच त्याचं मोठं कौतुक वाटलं. दीपस्तंभच्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे साधे जिने ज्यांच्यावरून आपण सहज ये-जा करतो त्या जिन्यावर हा मला अनेकदा भेटला. जवळपास त्याच्या उंचीच्या अर्ध्या उंचीचे हे जिने तो बिनधास्त चढताना दिसला की मोठे कौतुक वाटून जायचे. हळू-हळू ओळख वाढली. तसतसं तो खुलून बोलू लागला. त्याचं प्रत्येक व्यक्तीशी अदबीनं बोलणं लोकांना त्याच्या जास्तच प्रेमात पाडायला भाग पाडतं. त्याहून काहीअंशी अधिक त्याच्यात असलेली निरागसता. त्याची निरागसता सदृढ समजल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सत्य सांगून जाते.
पांडुरंग मुळचा नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एका छोट्याशा तांड्यावरचा हा पोरगा. ४० घरं असलेलं रामना नाईक तांडा, तोतंबा असं त्या तांड्याचं नाव. आई-वडील एक मोठी बहिण आणि दोन भाऊ आणि हा चौथा. सगळे शरीराने सामान्य. मात्र पांडुरंगची शरीराची उंचीच वाढली नाही. जन्मताच हे ‘वरदान’ लाभलेलंय असे पांडुरंग म्हणतो. खरंतर तर कुणाच्या शरीराचं वर्णन करणे चुकीचेच. त्यातला त्यात दिव्यांग बांधवांच्या शरीराचे वर्णन करणे एक प्रकारची अतिरीक्त सहानुभूती मिळविण्याचा प्रकार. मात्र पांडुरंगच्या परवानगीने त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतोय. ३ फुट २ इंचाचा पांडुरंग. त्याचे हात अतिशय छोटे. आणि त्या हाताला बोटे म्हणजे बोराच्या आठळ्यासारखीच. पायाची देखील रचना अगदी तशीच. तरीही तो आपली सगळी कामे स्वता करतो. त्याचे दोन हात एकमेकांना जुळवण्यासाठी त्याला मोठी कसरत करावी लागते. त्या हातांमध्ये पेन धरून तो लिहितो. असं असूनही त्याचं हस्ताक्षर निश्चितच सुंदर. तो लगबगीने चालतो, धावतो. यामुळेच रस्त्यावरून ये-जा करणारा प्रत्येक माणूस त्याच्याकडे आकर्षिला जातोच.
अभ्यासात पहिल्यापासून हुशार. खेड्यात कुठल्याही स्पेशल कोर्सशिवाय त्याने शिक्षण घेतले. दहावीला ६० टक्के तर बारावीला ५२ टक्के मार्क्स मिळाले. ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयी चांगल्या नसल्याने मला यावेळी पूर्ण अभ्यास करायला मिळाला नाही, असे पांडुरंग सांगतो. दहावीपर्यंत शिक्षणाला सिरीयसली न घेणारा पांडुरंग त्याच्या शिक्षिका शुभांगी दिवे यांच्यामुळे शिक्षणाकडे ओढला गेला. बारावीनंतर किनवटला तालुक्याच्या ठिकाणी शिकायला जावे लागायचे. त्याने जिद्द सोडली नाही. बीकॉमला त्याने ७५ टक्के मार्क्स मिळवत त्याच्या शिक्षणाची उंचीच सिद्ध केली तर त्यापुढेही जाऊन मुक्त विद्यापीठात त्याने बीए केलं ज्यात त्याला ८५ टक्के मार्क्स मिळाले. अर्थातच ‘मार्क्स’वर विद्वता ठरत नसते हे पांडुरंग देखील मान्य करतो. माणसाकडे स्कील असावं असं तो सांगतो. पांडुरंग ४ थीला असताना त्याने शाळेत धावण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला होता. त्याला कबड्डी, खो-खो, क्रिकेट खेळायला फार आवडतं. विशेष म्हणजे तो दररोज व्यायाम करतो. वेगवेगळ्या करतब दाखवतो.
तुला काही प्रॉब्लेम्स वगेरे येत नाहीत का? असा प्रश्न विचारल्यावर पांडुरंग उलट मलाच म्हणाला की, ‘कसले प्रॉब्लेम? मला काहीच प्रॉब्लेम्स वाटत नाहीत. मी माझी सगळी कामे वेळेवर करतो. आपल्याला देवाने असे का बनविले यावर विचार करत बसण्यापेक्षा मी माझी कामे स्वता करण्यावर भर देतो. मी सामन्यांप्रमाणे धावू का शकत नाही? माझी उंची अशी का आहे? यावर विचार करून मी स्वताला कमी का लेखावं? असा उलट सवाल तो आपल्यालाच करतो. मला म्हणजे आमच्यासारख्या अनेक प्रकारच्या दिव्यांग बांधवांना केवळ सहानुभूती नकोय, हवं तर मार्गदर्शन करा, प्रेरणा द्या, असे पांडुरंग सांगतो. पांडुरंगला आयएएस व्हायचंय. किनवटला एका कार्यक्रमात दीपस्तंभचे संचालक यजुर्वेंद्र महाजन आणि आदिवासी समाजातील आयएएस अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांना तो भेटला. त्यांनी याला जळगावला आणलेय. आता तो बँकिंगसाठी तयारी करत आहे. तो म्हणतो, सध्या मला कुठल्याही एका नोकरीची गरज आहे. मला माझ्या पायावर लवकर उभा राहायचंय. नोकरी लागल्यावर पहिला पगार दिव्यांग (अपंग) आणि प्रज्ञाचक्षु (अंध) बांधवांसाठी ‘मनोबल’लाच देणार हा त्याचा निश्चय. त्याची ही निस्वार्थ भावना प्रत्येक माणसाला त्याच्यावर प्रेम करण्याला बाध्य करते.
पांडुरंग म्हणतो, ‘खरतर मला शिकायची काही गरज नव्हती. मी कुठल्याही मंदिराबाहेर बसलो तर आरामात शरीराचं व्यंग दाखवून पैसा कमवू शकेल. पण मला वेळीच शिक्षणाचे महत्व समजल, हे बरं झालं. शुभांगी दिवे, यजुर्वेंद्र महाजन, आयएएस डॉ.राजेंद्र भारुड यांच्यासारखे चांगले मार्गदर्शक भेटले अन जीवनाचा खरा अर्थ समजला. मी असा आहे म्हणून लाचारीची जिंदगी जगणार नाही’, असं पांडुरंग ठासून सांगतो. माझ्यावर अनेक लोकं प्रेम करतात, याचे मला प्रचंड समाधान लाभते. यामुळे मी सदैव खुश राहतो. निराशेचा गर्तेत जगण्यापेक्षा जगण्याचा संघर्ष केलेलाच बरा, असेही तो सांगतो. पांडुरंगचा आत्मविश्वास माझ्यासारख्या तथाकथित सामान्य माणसाची झापडं खाडकन उघडतो. परीक्षेत मार्क्स कमी पडले म्हणून आत्महत्या करणाऱ्या, चैनीच्या गोष्टींसाठी आई-बापाला जेरीस आणणाऱ्या, छोट्या-छोट्या गोष्टींसाठी मरायचे विचार करणाऱ्या आजच्या युवापिढीने या पांडुरंगाचे दर्शन ‘मनोबल’मध्ये जाऊन नक्की घ्यावे. पंढरीच्या पांडुरंगाला भेटल्यावर जी अनुभूती एक सच्चा वारकरी घेतो अगदी तशीच अनुभूती या पांडुरंगाला भेटल्यावर प्रत्येक माणूस घेतो.
निलेश झालटे
9822721292