जगण्यातील स्वाभाविकता हीच संस्कृती : डॉ. देखणे

0

माती, नाती व संस्कृती विषयावर व्याख्यान

निगडी : भारतीय संस्कृतीला सुमारे 5000 वर्षांची परंपरा वारसा असून ती जगाला शांतीचा संदेश देणारी संस्कृती आहे. संस्कृतीच्या संवर्धनामध्ये विभिन्न घटकांचा समावेश आहे. यामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती, भारतातील संत महात्मे ऋषीमुनी, सर्व लोककलाकार, साहित्यिक, संगीत, गायक , चित्रकार तसेच श्री विठ्ठलाचे वारकरी आदीचा समावेश होतो. संस्कृतीचे मुर्तीमंत रूप म्हणजे साने गुरुजी. त्यांच्या भारतीय संस्कृती या पुस्तकाचे, पठण, चिंतन प्रत्येक शाळांनी व पालकांनी करणे गरजेचे आहे, असे मत विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे यांनी मॉडर्नच्या वसंत व्याख्यानमालेत बोलताना व्यक्त केले. ‘माती, नाती व संस्कृती’ या विषयावर ते बोलत होते. प्रसंगी व्यासपीठावर संयोजक शरद इनामदार, नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे व सुमन पवळे आदी उपस्थित होते.

सोशल मिडियामुळे सुसंवाद हरपला
डॉ. देखणे पुढे म्हणाले की, आचार, विचार, उच्चार, भाषा, आहार, विहार या प्रणालीचा उत्तम संगम म्हणजे थोर संस्कृती होय. भारतीय एकत्रित कुटुंबव्यवस्थेचे आचरण हीच खरी संस्कृती आज जगमान्य झालेली आहे. घरातील आजी-आजोबा संस्कृती विद्यापीठाचे कुलगुरू असतात. आज कुटुंबातील हा संस्कार व हरविलेला सुसंवाद सोशल मेडियामुळे आणखी दुरावत चाललेला आहे. हा सुसंवाद जगण्याचा आनंद पुन्हा निर्माण करण्याची गरज आहे. प्रतिवर्षी पंढरपुर श्री दर्शनाच्या ओढीने निघणारे वारकरी हे संस्कृतीचा एक उत्स्फूर्त जीवन प्रवाह आहे. आपला भारतीय इतिहास आपणांस पुरषार्थ शिकवतो तर अध्यात्म परमार्थ शिकवितो. निर्भयतेकडून निरागसतेकडे नेणारा प्रवास म्हणजे संस्कृती होय. जन्म देणार्‍या मातीशी जो एकनिष्ठ असतो तोच नाती जपतो, मित्र जोडतो. संवेदनशील मनोवृत्तीतून, स्वाभाविक जीवन जगतो, तोच खरा सुसंस्कृत समाज व हीच खरी काळाची गरज आहे. याप्रसंगी सूत्रसंचालन आशा कुंजीर तर आभार दिलीप गुंड यांनी मानले.