खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रतिहल्ला
पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी पक्षातून पराभव होण्याच्या भीतीने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार झालेल्या आणि गेल्या चौदा वर्षात चौदा वेळाही विधानसभेत ‘तोंड’ न उघलेल्या मौनी आमदार म्हणून ख्याती असलेल्या लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहराची पुरती वाट लावली आहे. राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेने भाजपच्या हातात सत्ता दिली. परंतु, राष्ट्रवादीत सत्तेची चटक लागलेल्या याच नेत्यांच्या हातात सत्ता आल्याने पुन्हा पालिकेत भ्रष्टाचार अनागोंदी कारभार सुरु आहे. दीड वर्षांच्या कारभाराला जनता कंटाळली असून जगतापाचा ‘ताप’ पिंपरी-चिंचवडकरांना होतोय. शहरातील पाणी, कचरा, वाढती गुन्हेगारी या समस्यांना सर्वस्वी जबाबदार आमदार लक्ष्मण जगतापच असल्याचा घणाघाती हल्लाबोल शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी रविवार रोजी सवांद खासदाराशी हा कार्यक्रम आकुर्डी येथे घेतला. या कार्यक्रमास मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी लेखी व तोंडी प्रश्न विचारले होते. आपणांस 2014 च्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी मदत केली नाही का? यावर खासदार बारणे म्हणाले होते, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझे निवडणुकीत प्रामाणिक काम केले होते. त्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर सध्या पक्षात नव्याने आलेल्या काही इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी अतिक्रमण केले आहे. बारणे यांचे हे शब्द जगताप यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी नेहमीच्या स्वभावाप्रमाणे मुळ मुद्याला बगल देत बारणे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करत प्रसिद्धपत्रक काढले. त्यास बारणे यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले.
14 वेळाही तोंड उघडले नाही
खासदार बारणे म्हणाले की, 2014 च्या लोकसभा निवडणुकीचा पराभव जगताप यांच्या जिव्हारी लागला आहे. आपण पुन्हा राष्ट्रवादी पक्षात आमदार होणार नाही हे त्यांना पुरते कळून चुकल्याने ते मोदी लाटेत भाजपवासी झाले. गेल्या चौदा वर्षात चौदा वेळाही विधान सभेत तोंड न उघडलेल्या जगताप यांच्याकडे मौनी आमदार म्हणून पहिले जाते. राष्ट्रवादी पक्षाच्या कारभारावर नाराज असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या जनतेला बदल हवा म्हणून भाजपला सत्ता दिली.