आमदार, नगरसेवक यांच्या प्रयत्नांना यश
तळवडे (मनीषा थोरात-पिसाळ) :- पिंपरी-मोजे तळवडे येथे 58 एकर जागेत प्राणीसंग्रहालय किंवा सफारी पार्क करण्याचे नियोजन आहे. शहरासाठी हे एक आकर्षक पर्यटन असणार आहे. सिंगापूर येथील जगप्रसिध्द जुराँग बर्ड पार्कच्या धर्तीवर हे पक्षीउद्यान असणार आहे. या पार्कचे काम मार्गी लावण्यासाठी मागील काही वर्षांपासून आमदार, नगरसेवक यांचे प्रयत्न सुरु आहे. सध्या हा प्रकल्प शासनस्तरावर प्रलंबित आहे. प्रकल्पाच्या पुढील नियोजनासाठी पुणे जिल्हाधिकारी राम किशोर नवल, पिंपरी-चिंचवड आयुक्त श्रावण हार्डीकर, आमदार महेश लांडगे आणि स्थानिक नगरसेवक यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन कऱण्यात आले आहे.
प्राणी संग्रहालयासाठी आरक्षित जागा
सफारी पार्कचा प्रकल्प तळवडे येथील 58 एकर क्षेत्रामध्ये हरीण उद्यान आणि प्राणी संग्रहालयासाठी आरक्षित आहे. या उद्यानासाठी महापालिका 2015 पासून प्रयत्नशील आहे.6 मे 2017 रोजी शासनाकडे या प्रकल्पासाठी 66 कोटी 90 लाख रूपये जमा असल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयातून महापालिकेला देण्यात आले आहे. मात्र महापालिकेने 3 जून 2017 रोजी जागेचे प्रयोजन सार्वजनिक हिताचे असल्याने नाममात्र 1 रूपया दराने जागा हस्तांतरीत कऱण्याबाबतचे पत्र पाठविले आहे. त्यानुसार प्रकल्पाच्या कामाची पुढील कार्यवाही सुरु आहे. मागील काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पासाठी जन सर्वेक्षण करण्यात आले आहे.
सफारी पार्कसाठी पाठपुरावा सुरू
आमदार महेश लांडगे यांनी सांगितले की, डिअर सफारी पार्कचा प्रकल्प लवकर मार्गी लागण्यासाठी आमच्याकडून पाठपुरावा सुरु आहे. या प्रकल्पाच्या पुढील नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांच्या उपस्थितीत बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये प्रकल्पातील पुढील नियोजना संदर्भात चर्चा होणार आहे. महापालिकेतर्फे या प्रकल्पाच्या जागेसाठी 1 रूपयाने जागेचे हस्तांतरण करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
चांगला रोजगार मिळेल
माजी नगरसेवक शांताराम भालेकर म्हणाले की, तळवडे येथे हा प्रकल्प झाल्यानंतर शहराच्या नावलौकीकात भर पडणार आहे. परिसरातील नागरिकांना चांगला रोजगार मिळण्यासही मदत होणार आहे. मागील काही वर्षांपासून फक्त प्रकल्पाबद्दल ऐकतोय मात्र हा प्रकल्प लवकर झाल्यास स्थानिकांना आणि शहरवासियांना समाधान मिळणार आहे.
सर्वच आमदारांनी पाठपुरावा करावा
राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रविण भालेकर यांनी सांगितले की, सफारी पार्कच्या प्रकल्पाचा पाठपुरावा राष्ट्रवादीच्या कार्यकाळापासून सुरु आहे. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. त्यामुळे या विषयात पक्ष किंवा राजकारण न करता तो मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. शहराच्या दृष्टीकोनातून आमदारांनीही पाठपुरावा केला पाहिजे.
प्रकल्पाच्या जागेत उद्यान
नगरसेवक पंकज भालेकर म्हणाले की, तळवडे गावच्या दृष्टीने नाईट सफारी पार्कचा प्रकल्प खूप महत्त्वाचा आणि अभिमानाचा आहे. या प्रकल्पासंदर्भात खूप वर्षापासून फक्त ऐकतो आहे. हा प्रकल्प लागेपर्यंत या प्रकल्पाच्या जागेत गावाकडील बाजूस एक उद्यान विकसित करावे. यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच या प्रकल्पासाठी अजून बरीच वर्ष लागतील, त्यामुळे नागरिकांना उद्यान विकसित केल्यावर सुखसुविधा मिळतील.
नागरिकांचे अभिप्राय घेतले
नगरसेविका पौर्मिमा सोनावणे व संगीता ताम्हाणे यांनी सांंगितले की, या प्रकल्पामुळे शहराच्या नावलौकीकात भर पडेल. पर्यटन विकासामुळे शहराचा विकास होईल. शहराच्या दृष्टीकोणातून सर्वात मोठा आणि महत्त्वाचा असा सफारी पार्कचा प्रकल्प असणार आहे. नगररचना विभाग उपअभियंता विनायक माने यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी महापालिकेने 3 जून 2017 रोजी जागेचे प्रयोजन सार्वजनिक हिताचे असल्याने नाममात्र 1 रूपया दराने हस्तांतरित करण्याबाबत शासनाला कळविले आहे. त्यापुढील कार्यवाही सुरु आहे. कार्यकारी अभियंता स्थापत्य उद्यान संजय कांबळे यांनी सांगितले की, सर्व नागरिकांचा अभिप्राय घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म वाटप कऱण्यात आले होते. त्यानुसार या ठिकाणी कुठले पार्क असावे यावर शहनिशा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या दृष्टीने सकारात्मक गोष्टी होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.