जगभरात आजपासून फुटबॉल फिव्हर

0

मॉस्को । रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आज गुरुवारपासून फुटबॉलचा महाकुंभमेळा अर्थात 21 व्या फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या-गुरुवारी सायंकाळी या विश्‍वचषक स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर जगातील आघाडीचे 32 संघ कोट्यावधी रुपयांच्या बक्शिासाची लयलूट करण्यसाठी एकमेकांना भिडतील. मॉस्कोतल्या ल्युझिनिकी स्टेडियमवर विश्‍वचषक स्पर्धेचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रिटिश पॉपस्टार रॉबी विल्यम्सचा परफॉर्मन्स हे या उद्घाटन सोहळ्याचे वैशिष्ट्य असणार आहे. शियाची नामवंत गायिका आयडा गारिफुलिनाच्या साथीने रॉबी विल्यम्स परफॉर्म करणार आहे. ब्राझिलचा 1994 आणि 2002 सालच्या विश्‍वचषक विजेत्या संघाचा सदस्य रोनाल्डो उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. या उद्घाटन सोहळ्यानंतर रशिया आणि सौदी अरेबिया संघांमध्ये सलामीचा सामना होईल.21 व्या फिफा विश्‍वचषक सहभागी झालेल्या 32 संघाची आठ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात चार-चार संघ असतील. प्रत्येक गटामधील दोन संघ बाद फेरीत प्रवेश करतील. या 32 संघापैकी सर्वात श्रीमंत संघ स्वित्झर्ल्डंडचा आहे तर सर्वात गरीब सेनेगलचा आहे. लोकसंख्येनुसार या स्पर्धेत भाग घेणारा सर्वात मोठा देश ब्राझील आहे तर सर्वात लहान देश आईसलँड आहे.

कडक सुरक्षा व्यवस्था
फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेदम्यान अतिरेकी आणि हुल्लडबाजांकडून असलेला धोका लक्षात घेऊन रशियाने अतिशय कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. विश्‍वचषक स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार्‍या यजमान शहरांमध्ये आकाशातून होणार्‍या हल्ल्यांना सामोरे जाण्याची तयारी रशियाने ठेवली आहे. रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोत लढाऊ विमानांचा ताफा कोणत्याही क्षणी उड्डाणासाठी सज्ज ठेवण्यात आला आहे. गुरुवारचा उद्घाटन सोहळा आणि सलामीचा सामना यासाठी मॉस्कोत सुमारे तीस हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. फुटबॉलच्या देशीविदेशी चाहत्यांची पार्श्‍वभूमी शोधून काढण्याची मोहीमही रशियाने व्यापक पातळीवर हाती घेतली आहे. परदेशी चाहत्यांना रशियात दाखल झाल्यावर पोलीस स्थानकामध्ये जाऊन आपली नोंदणी करावी लागणार आहे.

तब्बल 32 वर्षांनंतर उत्तर अमेरिकेत फिफा विश्‍वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. 2026 च्या फिफा विश्‍वचषक स्पर्धेच्या यजमानपदाची संधी मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेला देण्यात आली आहे. आफ्रिकेतील मोरोक्कोदेखील विश्‍वचषक स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीत होता. मात्र मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेनं मोरोक्कोला मागे टाकत यजमाननपद पटकावले. फिफा विश्‍वचषक स्पर्धा 2026 चे यजमानपद कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यासाठी 203 देशांनी मतदान केले. यानंतर फिफाचे अध्यक्ष जिआनी इन्फेंटिनो यांनी विजेत्यांची घोषणा केली. या कार्यक्रमाला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन काही वेळ उपस्थित होते. 2026 मध्ये होणार्‍या विश्‍वचषक स्पर्धेच्या यजमानपदासाठी झालेल्या मतदानात मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेला 134 मते मिळाली. तर मोरोक्कोला केवळ 65 मते मिळाली. याआधी उत्तर अमेरिकेने तीनवेळा या स्पर्धेचे यजमानपद भूषवले आहे. तर आफ्रिकेने एकदा स्पर्धेचे आयोजन केले आहे. अमेरिकेने 1994 मध्ये स्पर्धेचे यजमानपद भूषवले होेते. त्यावेळी पहिल्यांदाच अमेरिकन संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.

झाबिवाका
रशियातील या विश्‍वचषक स्पर्धेचे बोधचिन्ह म्हणून निवड करण्यात आलेल्या लांडग्याचे झाबिवाका असे बारसे करण्यात आले आहे. पांढर्‍या आणि करड्या रंगांमधला हा लांडगा फिफा विश्‍वचषक स्पर्धेचे आकर्षण ठरणार आहे. या झाबिवाकाने रशियन राष्ट्रध्वजाच्या रंगातले कपडे परिधान केले असून त्याच्या टी शर्टवर रशिया 2018 असे लिहिण्यात आले आहे. फिफाने 2016 साली झाबिवाकाचं अनावरण केलं होतं. एकाटेरिना बोकारोव्हा या रशियन विद्यार्थ्याने हे बोधचिन्हाचे रेखाटन केले आहे. फिफा विश्‍वचषकाचे उद्घाटन जसेजसे जवळ आल्यावर सोशल मीडियावर अधिकाधिक झाबिवाकाची लोकप्रियता वाढत गेली.

अदिदास टेलस्टार एटिन
रशियातल्या फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेत अदिदास टेलस्टार एटिन हा बॉल वापरण्यात येणार आहे. क्रीडासाहित्याचे उत्पादन करणारा उद्योगसमूह अदिदासने या फुटबॉलची निर्मिती केली आहे. 1970 सालच्या मेक्सिको विश्‍वचषकापासून प्रत्येक विश्‍वचषक स्पर्धेत अदिदासचा चेंडू वापरण्यात येत आहे. रशियातही अदिदास टेलस्टार चेंडूचा वापर होणार आहे.