जगभरात भारतीय युवकांचे अधिराज्य!

0

जळगाव । ध्येयाची तहान, सकारात्मकता, संघर्षाची वृत्ती आणि अथक परिश्रम यांच्या बळावर जगातल्या कुठल्याही शक्तीला तोंड देण्याची क्षमता भारतीय युवा मनात असून येत्या दशकात जगभरात ऊर्जेने भारलेल्या भारतीय युवकांचे जगावर अधिराज्य असेल, असा आशावाद आयआयटी प्रशिक्षणाचे प्रणेते आनंदकुमार यांनी व्यकत केला. तर आई-वडिल आणि संस्कार हेच महत्वाचे असून जगात कुठेही गेलात तरी हे धन सातत्याने जवळ ठेवा. स्त्री तत्वाचा आदर करुन तरुणाईने जगासमोर आदर्श निर्माण करावा अशी अपेक्षा जागतिक स्कायडायव्हींगपटू शितल महाजन हिने अभाविपच्या अधिवेशनात व्यक्त केली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. प्रस्तावना सचिन बोरसे यांनी केली. स्वागताध्यक्ष अशोक जैन यांनी मनोगत व्यक्त करतांना 1982 ते आजपावेतो अभाविपच्या विविध उपक्रमांच्या सान्निध्यात घडलेल्या प्रसंगांचे दाखले देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख नेतृत्वाबाबत प्रबोधन केले.

डॉ.साठेंनी मांडली संकल्पना
प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रशांत साठे यांनी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मागची संकल्पना स्पष्ट करतांना ज्ञान, संस्कार आणि संघर्ष या त्रिसुत्रीची मिमांसा केली. यावेळी न बिघडणार्‍या समाजाची जडणघडण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होते आहे. लवकरच देशाची तरुणाई सेवा, समर्पण अन् देशभक्ती या त्रिसुत्रीवर मार्गस्थ होतांना दिसेल. जगभरात राष्ट्रवाद जोपासणार्‍या भावी पिढीकडून देशाला अपेक्षा आहेत. त्याची परिपूर्ती करण्याचे सामर्थ्य तरुणाईमध्ये सातत्याने जाणवत असल्याचे प्रतिपादन केले.

आयआयटी प्रशिक्षणाचे मार्गदर्शन
स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा आदर्श ठेवून बिहारसारख्या राज्यात गरीब, कष्टकरी व श्रमिक वर्गातील कुटुंबाच्या होतकरु मुलांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेऊन ध्येयाने भारलेल्या आनंदकुमार यांनी आपल्या वाटचालीचा लेखाजोखा मांडतांना केंब्रिज येथे जाण्यासाठी आश्‍वासित केलेल्या व्यक्ती व संस्थांनीही ऐनवेळी मदत नाकारल्याने परदेशगमनाची संधी हातची गेल्याची खंत न बाळगता गरीब विद्यार्थ्यांना आयआयटीचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘सुपर-30’ या प्रवेश परीक्षेचे मार्गदर्शन प्रकल्पाचा शुभारंभ केला. आजतागायत एकूण 296 गरीब विद्यार्थी आयआयटीत प्रथम श्रेणी मिळवून यशस्वी झाल्याचे सांगून, आतापर्यंतच्या वाटचालीवर प्रख्यात अभिनेते ऋत्विक रोशन हे पुढील वर्षी बायोपिक प्रदर्शित करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्ञानार्जन करत असतांना संस्कारांची कास धरुन ठेवणे अत्यंत महत्वाचे असून सतत उच्च ध्येय बाळगत प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि आई- वडिलांनी दिलेल्या प्रेरणा घेऊन जीवनाची यशस्वी वाटचाल करा, मात्र हे करत असतांना जगाकडे पाहण्याचा उदात्त दृष्टिकोन आणि संस्काराची पाऊलवाट सातत्याने चालत राहा असा संदेश शितल महाजनने तरुणाईला देऊन, स्वत:च्या स्कायडायव्हींग क्षेत्रातील प्रगतीबाबत सोदाहरण सांगतांना प्रत्येक टप्प्यावर जैन उद्योग समूहाने केलेली मदत ही उल्लेखनीय ठरल्याचे सांगितले.

यांची होती उपस्थिती
शिवतीर्थ मैदानावर 24 ते 26 डिसेंबर दरम्यान होणार्‍या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 52 व्या प्रदेश अधिवेशनाचा शुभारंभ जल्लोषात झाला. यावेळी बिहारमध्ये ‘सुपर -30’ या आयआयटी प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शन करणार्‍या प्रकल्पाचे जनक आनंदकुमार आणि 19 राष्ट्रीय व 6 जागतिक विक्रम करणारी स्कायडायव्हींगपटू भूमीकन्या शितल महाजन, नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.प्रशांत साठे, प्रदेशमंत्री राम सातपुते, स्वागताध्यक्ष अशोक जैन आदींची प्रमुख उपस्थिती होती.