पुणे । मनुष्यबळाच्या जोरावर चीनने जगाची बाजारपेठ काबीज केली. त्याच चीनमध्ये आज मजुरीचे दर वाढत आहेत. याचाच फायदा घेऊन तरुणांनी स्वत:मधील कौशल्य ओळखून ती विकसित करावीत व अधिक कौशल्य प्राप्त करून स्मार्ट फोन व इंटरनेटच्या मदतीने जगाची बाजारपेठ काबीज करावी, असे आवाहन कायनेटिक उद्योगाचे अध्यक्ष अरुण फिरोदिया यांनी केले.
अॅस्पायर नॉलेज अॅन्ड स्कील प्रायव्हेट लिमिटेड आणि बोधिनी महिला सेवाभावी संस्थेच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या स्कील अॅन्ड आंत्रप्रोनरशिप कॉनल्केव्हमध्ये फिरोदिया बोलत होते. अभिनेते मनोज जोशी, डॉ. दीपक शिकारपूर, अनंत सरदेशमुख, लहुराज माळी, राजेंद्र बेद यांच्या पत्नी रजनी बेद, के. डी. राठोड, संजय गांधी, डॉ. हुसेन हजीते उपस्थित होते.या कार्यक्रमात पदमश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनेते मनोज जोशी यांचा खास मानपत्र देऊन सत्कार कऱण्यात आला. तसेच ऑटोटेक कंपनीचे अध्यक्ष राठोड यांचा अॅस्पायर इनोव्हेशन आवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला. ‘आयटी करियर 2020 प्लस प्लस’ या डॉ शिकारपूर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
फिरोदिया म्हणाले, कोणतेही काम चांगले वा वाईट किंवा लहान मोठे नसते. अमेरिकेत आज सर्वच काम करणारे स्वत:ला श्रेष्ठच समजतात. तिथे सर्वांनाच एक सारखी वागणूक मिळते. तिथल्या इंजिनिअरपेक्षा जास्त पैसा प्लंबर कमावतो. त्यामुळे आपल्यातील कौशल्य आपणच ओळखून ते विकसित करून आपला उद्योग उभा करू शकतो. मनोज जोशी म्हणाले, प्रत्येकाच्यात कौशल्य हे दैवजात असतेच फक्त ते ओळखता आले पाहिजे. प्रत्येकाला विद्या मिळवण्यासाठी मेंदू लागतो तर कौशल मिळवण्यासाठी मेंदू बराबरोबरच हृदयही लागते.