अबुधाबीतील रूग्णालयात निधन
दुबई : जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमद अब्दुलाती (37) हिचे सोमवारी पहाटे अबुधाबीतील रूग्णालयात निधन झाले. शरीरात अचानक बिघाड झाल्याने इमानचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी म्हटले आहे. इमानवर दुबईतील बुर्जील रूग्णालयात उपचार सुरु होते. मुंबईतील सैफी रूग्णालयानेसुद्धा इमानच्या निधनाला दुजोरा दिला. हॉस्पिटलच्या म्हणण्यानुसार, अनेक व्याधींनी ग्रासलेल्या इमानचा हृदयविकार बळावल्याने आणि मूत्रपिंड निकामी झाल्याने प्राणज्योत मालवली.
कार्गो विमानातून मुंबईत
इमान अहमद अब्दुलाती मूळ इजिप्तची रहिवासी होती. एलिफेंटायसिस आजारामुळे लहानपणापासून तिचे वाढू लागले होते. अखेर तिचे वजन 500 किलोपेक्षा जास्त झाले होते. तिच्या शरीराची हालचाल पूर्णपणे बंद झाली होती. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, मेंदूविकार यासारखे आजार तिला जडले होते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिला उपचारही घेता येत नव्हते. गेल्यावर्षी मुंबईतील सैफी हॉस्पिटलने तिच्यावर उपचाराची तयारी दाखवल्याने तिला फेब्रुवारी महिन्यात मुंबईत आणण्यात आले. 504 किलो वजनाची इमान कार्गो विमानातून मुंबईत पोहोचली होती.
300 किलो वजन कमी केले होते
मुंबईत बॅरिएट्रिक सर्जरीद्वारे आणि टीमने वेगवेगळ्या थेरपींमुळे डॉ. मुफ्फजल लकडावाला यांच्या टीमने तीन महिन्यांत इमानचे वजन 300 किलोहून अधिक कमी केले होते. डॉक्टरांच्या या कामगिरीचे जगभरातून कौतुक झाले, पण इमानची बहिण शायमाने रूग्णालया प्रशासनावर आरोप केला होता. इमानच्या वैद्यकीय अहवालावर तिने शंका उपस्थित केली होती. त्यानंतर, इमानला अबुधाबीला हलवण्यात आले होते.