जगातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरीत होणार

0

नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठे तेल शुद्धिकरण केंद्र बनण्याच्या दृष्टीने भारताने वाटचाल सुरू केली आहे. सुमारे 6 कोटी टन इतकी क्षमता असलेल्या तेलशुद्धिकरण प्रकल्पासाठी सार्वजनीक क्षेत्रातील प्रमुख कंपन्या असलेल्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांनी एकत्र येऊन संयुक्त कंपनी स्थापन करण्याच्या करारावर सह्या केल्या आहेत. पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान, पेट्रोलियम सचिव के.डी. त्रिपाठी यांच्या उपस्थितीत इंडियन ऑईलचे प्रमुख संजीव सिंग, हिंदुस्थान पेट्रोलियमचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश कुमार सुराना आणि भारत पेट्रोलियमचे व्यवस्थापकिय संचालक डी. राजकुमार यांनी या करारावर सह्या केल्या.

दोन टप्प्यांमध्ये होणार
हा तेलशुद्धिकरण प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये तयार होणार आहे. पहिल्या टप्प्यात 4 कोटी टन क्षमतेचे अ‍ॅरोमॅटिक कॉम्प्लेक्स, नाफ्था क्रॅकर आणि पॉलिमर कॉम्प्लेक्स उभारण्यात येतील. पहिल्या टप्प्यसाठी सुमारे 1.50 लाख कोटींचा खर्च होऊ शकतो. या प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेतल्यावर पुढील 5 ते 6 वर्षांमध्ये हा प्रकल्प तयार होईल. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पात तीन क्रुड युनीट्स लावण्यात येतील. या प्रत्येक युनीटची क्षमता सुमारे 2 कोटी टन इतकी असेल. दुसर्‍या टप्प्यातील प्रकल्पाच्या उभारणीसाठी 50 ते 60 हजार कोटी रुपयांचा खर्च होऊ शकतो.

आयओसीचा हिस्सा
या तेल शुद्धिकरण प्रकल्पात 50 टक्के भागिदारी इंडियन ऑईलची असणार आहे. तर उर्वरीत 25-25 टक्के भागिदारी भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमची असणार आहे. भविष्यातील इंधनाची वाढती मागणी आणि देशातून तेल आणि वायु निर्यात करण्याच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यात बाबुलवाडी येथे हा शुद्धिकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

अनेक कंपन्याची तयारी
जगातील सर्वात मोठ्या ठरणार्‍या या तेलशुद्धिकरण प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी आर्मको या जगातील मोठ्या तेल उत्पादक कंपनीने रस दाखवला होता. सौदी अरबचे उर्जा, उद्योग, खनीजसंपत्ती मंत्री आणि सौदीआर्मकोचे प्रमुख खालिद ए अल फलीह यांनी गेल्या महिन्यात जिनिव्हात भारताचे पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा केली होती. याशिवाय बठिंडा रिफायनरी, सौदी अरबमधील अबू धाबी नॅशनल ऑइलने या प्रकल्पामध्ये स्वारस्य दाखवले होते.