रूसच्या मॉडेलला जगातील सर्वात लांब पायांची मॉडेल होण्याचा मान मिळाला असून तिचे नाव त्यासाठी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येदेखील नोंदवले गेले आहे. एकाटेरिना लि सिना असे या 29 वर्षीय मॉडेलचे नाव असून तब्बल सहा फुट नऊ इंच तिची उंची असून पायांची लांबी 52.2 इंच एवढी आहे. जेव्हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 2018 च्या कार्यक्रमासाठी एकाटेरिना गेली तेव्हा तिची उंची पाहून टीव्ही अँकरदखील हैराण झाले होते. त्यांनी त्यावेळी तिच्याशी बोलण्यासाठी स्टुलचा वापर केला होता.
एकाटेरिना ही जगातील सर्वात उंच मॉडेल आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिच्या नावाची नोंद झाल्याने तिला आनंद झाल्याचे, खुद्द एकाटेरिनाने सांगितले. तिच्या घरातील सर्वच सदस्यांची उंची सहा फुटापेक्षा अधिक आहे. तिच्या वडिलांची उंची सहा फुट पाच इंच तर आईची उंची सहा फुट एक इंच एवढी आहे. तिच्या भावाची उंचीही सहा फुट सहा इंच एवढी आहे. एकाटेरिनाच्या डाव्या पायाची लांबी 132.8 सेमी आणि उजव्या पायाची लांबी 132.2 सेमी आहे. ती सांगते, की आज तिची उंची तिची ओळख आहे, पण कधी काळी तिला तिच्या उंचीबद्दल खूप काळजीही वाटायची. तिचे मित्रही तीच्यावर शेरीबाजी करायचे. एकाटेरिना बास्केट बॉल खेळाडू असून 2008 मध्ये तिने आपल्या देशाचे प्रतिनिधित्वही केले होते. बीजिंगमध्ये झालेल्या स्पर्धेत तिला कांस्य पदक मिळालेले आहे. खेळाडू असण्यासोबतच ती मॉडेलिंगही करते.