जगात १९१ देशात पर्यटकांचे स्वागत करणारी कंपनी भारतात

0

मुंबई – महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भ्रमण कार्यक्रम य़शस्वी व्हावा यासाठी जगातील अग्रगण्य अशा एअरबीएनबी कंपनीशी आज सामंजस्य करार करण्यात आला. जगातील 191 देशात पर्यटकांचे आदरातिथ्य करणारी ही कंपनी राज्यात या क्षेत्रात 50हजार लघुउद्योजक तयार करणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत दिली.

या करारामुळे राज्यात घरगुती निवास व्यवस्थांचा दर्जा उंचावणार आहे. राज्यातील पर्यटन व्यवसाय जगात नावलौकिक मिळवेल. राज्याचे पर्यटनाद्वारे मिळणारे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढेल. राज्याच्या ज्या भागात पर्यटक जातील तेथील रितीप्रमाणे त्यांचे पारंपरिक पद्धतीने आदरातिथ्य व उपहार व्यवस्था असेल, असे ते म्हणाले.

एअरबीएनबीशी सामंजस्य करार केल्यामुळे महाराष्ट्रात 191 देशांतील पर्यटक येऊ शकतील. त्यामुळे 20 टक्के महसूल वाढेल. महाराष्ट्रात डोंगर, जंगले, समुद्र किनारे, ऐतिहासिक स्थळे, किल्ले, भंडारदरा, चिखलदरा यासारखी निसर्गरम्य स्थळे मोठ्या प्रमाणावर असून पर्यटनाला प्रचंड वाव आहे. ज्या गावात हे पर्यटन स्पॉट आहेत तिथे तेथील संस्कृतीनुसार पर्यटकांचे आदरातिथ्य होईल. ऐतिहासिक ठिकाणी तुतारी फुंकून, नववारी वेशभूषेतील स्वागतिका परंपरागत पद्धतीने स्वागत करतील असेही त्यांनी सांगितले.