जगासाठी नवा धोका

0

मागील आठवडा संपता संपता अवघ्या जगाला अस्थिर करून गेला आहे. ही अस्थिरता लवकर संपावी, अशी अपेक्षा आहे. कारण याचे दूरगामी परिणाम अवघ्या जगाला भोगावे लागणार आहेत. सीरियाचे प्रमुख बशर आसाद यांनी त्यांच्याच देशातील नागरिकांविरोधात रासायनिक बॉम्बहल्ला केला. त्याच कच्चाबच्च्यांसह सुमारे 100 जणांचा मृत्यू झाला, तर 400 जण जखमी झाले आहे.

रासायनिक हल्ल्यात जखमी असणे म्हणजे कायमचे शारीरिक व्यंगत्व येणे, या कारवाईनंतर येथील नागरिकांना या रासायनिक हल्ल्याचे पुढे किती वर्षे दुष्परिणाम सहन करावे लागणार आहेत, हे लवकरच समजेल. मात्र, दुसर्‍या महायुद्धानंतर असा रासायनिक बॉम्बहल्ला पहिल्या प्रथमच करण्यात आला आहे. या घटनेचे मानवाधिकाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. मात्र, असे असतानाही संयुक्त राष्ट्र संघाने सीरियावर थेट कारवाई करण्याचा प्रस्ताव मांडला नाही किंबहुना तसा विचारही केला नाही. ही घटना सीरियाचा देशांतर्गत मामला होता. त्यामुळे त्यावर काय न्यायनिवाडा द्यायचा, याचे प्रथम प्राधान्य त्या देशातील सरकारला जाते. दुसर्‍या महायुद्धा अण्वस्त्र हल्ल्यानंतर अवघे जपान बेचिराख झाले होते, लाखो जणांचा मृत्यू झाला होता. अवघ्या जगाने हा थरकाप पाहिला होता. त्यामुळे आता तिसरे महायुद्ध होऊच द्यायचे नाही, या विचारावर जगातील प्रमुख देश एकवटले आणि त्यातून संयुक्त राष्ट्र संघाची त्याच्याशी संलग्नित विविध संस्थांची स्थापना झाली. जगात कुठेही अस्थिरता निर्माण झाली तर आता अमेरिका किंवा रशिया या देशांची हस्तक्षेपाची मक्तेदारी यामुळे खरेतर संपुष्टात आली आहे. कारण त्याचे सर्व अधिकृत निर्णय जगातील सर्व देशांनी संयुक्त राष्ट्र संघाला दिले आहे. मात्र, मागच्या आठवड्यात अघटित घडले.

सीरियात रासायनिक बॉम्बहल्ला झाल्याची व्हिडिओ क्लिप पाहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 तासांत सीरियावर 59 टॉमहॉक क्रूज मिसाइलचा मारा केला. अशा प्रकारच्या कारवाईला संयुक्त राष्ट्र संघाची अनुमती नव्हती. मात्र, त्याला न जुमानता ट्रम्प यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकाराने ट्रम्प यांनी सर्व जगाने संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यमातून आखून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन करत हम करे सो कायदा असा संदेश दिला आहे. ट्रम्प यांच्या या अशा आतातायीपणाचे दुष्परिणाम जगाला तिसर्‍या महायुद्धाच्या दारापर्यंत आणून ठेवतील का, अशी भीती आता वाटू लागली आहे. कारण तसे संकेतही लागलीच प्राप्त झाले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर रशियाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कारण रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा सीरियाचे प्रमुख आसाद यांच्यावर वरदहस्त आहे. त्यांच्या संरक्षणार्थ रशिया थेट अमेरिकेशी दोन हात करण्यास तयार असून, तसे सूचितही करण्यात आले आहे.

अमेरिकेने सीरियावर थेट क्षेपणास्त्र हल्ला करून सीरियासह यमन आणि इराकमध्ये सैन्य कारवाईचे संकेत देऊन अप्रत्यक्षपणे उत्तर कोरिया आणि इरान या देशांनाही दमात घेण्याचा प्रयत्न केला आहे. आखाती देशांवर वर्चस्व मिळवण्याची अपेक्षा अमेरिकेची लपून राहिलेली नाही. त्याचे दुष्परिणाम जगाला दहशतवादाच्या रूपाने भोगावे लागत आहेत. अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट संपुष्टात आल्यानंतर सीरियातील आयसिस नावाने नव्या स्वरूपात आखाती देशातून दहशतवादाने उभारी घेतली आहे. त्यामुळे जगावर वर्चस्व मिळवण्यासाठी अमेरिकाकडून वारंवार केल्या जाणार्‍या कुरघोडीतून जगासमोरच नवनवीन संकटे उभी राहत असतात.

अमेरिकेच्या कारवाईमुळे रशिया आणि अमेरिका आता युद्धापासून अवघे एक पाऊल दूर आहेत, असा इशारा रशियाने दिला आहे. काही क्षणात संपूर्ण शहरे बेचिराख करणारी आण्विक शस्त्रे दुसर्‍या महायुद्धात जगाने अनुभवली. त्यानंतर बहुतांश देशांनी अशी आण्विक शस्त्रे बाळगण्याचा जणू चंगच बांधला. आज ही अशी शस्त्रे असलेल्या अधिकृत देशांप्रमाणे अनधिकृत देशांची संख्याही अधिक असू शकते. याउपर सीरियात झालेला रासायनिक हल्ला ही एक झलक होती, याहून भयंकर रासायनिक बॉम्ब, क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे. एकूणच काय तर दुसर्‍या महायुद्धानंतर शस्त्रास्त्राने स्वत:ला अधिकाधिक सुरक्षित बनवण्याच्या नादात जगातील सर्व देशांनी संपूर्ण जगाला असुरक्षित बनवले आहे.

काळानुरूप मानवी स्वभाव वैशिष्ट्येही बदलत चालली आहे. संयम, वैचारिकता, सहकार्याची भावना इत्यादींचा वानवा मानवी स्वभाववैशिष्ट्यांमध्ये जाणवत आहे, त्याऐवजी तापटपणा, विध्वंसकता, हिंसा इत्यादी दुर्गुण घाऊक स्वरूपात जाणवतात. म्हणूनच की काय आज जगातील विविध देशांतील प्रमुख पदावर विराजमान असलेले सत्ताधीश मग ते अमेरिकेचे ट्रम्प, रशियाचे पुतिन, उ. कोरियाचे किम उन, सीरियाचा आसाद इत्यादी या दुर्गुणांचे प्रतीक बनले आहेत. आज शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेतून बहुतांश देश शक्तिशाली बनले आहेत. त्यामुळे त्या जोरावर आरे ला कारे करण्याची वृत्ती वाढीस लागली आहे. ट्रम्प यांच्या या कारवाईचे वर्णन गोंधळलेली आणि दिशाहीन असे विश्‍लेषकांनी केले आहे. आपण असे काही तरी धक्कादायक करू शकतो, हे दाखवून देणे इतकेच काय ते ट्रम्प यांचे सीरियावरील हल्ल्यामागील साध्य होते, असेही विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.