बंगरूळ: भारत आणि इंग्लंड दरम्यान रंगलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ५ धावांनी जिंकत टीम इंडियाने क्रिकेट रसिकांची मने जिंकली. या सामन्यात जसप्रित बुमराहने टाकलेले शेवटचे षटक निर्णायक ठरले. पण भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बुमराहला शेवटचा चेंडू टाकण्याआधी दिलेला सल्ला त्याचा आत्मविश्वास वाढवणारा ठरला. बुमराहकडे सामन्याचे शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी होती. त्या षटकात दोन महत्वपूर्ण विकेट घेतल्यानंतर शेवटच्या चेंडूवर इंग्लंडला विजयासाठी षटकाराची गरज होती. अशावेळी बुमराहवर दबाव येणे साहजिकच होते अशा परिस्थितीत चेंडू कसा टाकावा यासाठी कोहली आणि नेहराने बुमराहला सल्ला दिला होता. सामना जिंकल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कोहलीने बुमराहचे कौतुक केले. शेवटचा चेंडू टाकण्यापूर्वी तुमचे नेमके काय बोलणे झाले होते असे कोहलीला विचारले असता तो म्हणाला की, बुमरहाने शेवटचा चेंडू टाकण्याआधी आमची चर्चा झाली. मी फक्त त्याला त्याच्या नैसर्गिक गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला गेला तरी अजिबात चिंता करू नको, हे जग काही इथेच संपत नाही. उद्या तुला पुन्हा खेळायचे आहे. कोहलीने दिलेल्या या सल्ल्याने बुमराहचा आत्मविश्वास उंचावला आणि बुमराहने शेवटचा चेंडू अप्रतिम टाकला. मोईन अलीला बुमराहचा चेंडू खेळताच आला नाही आणि भारताने सामना ५ धावांनी सामना आपल्या नावावर केला.
वयाचा फरक पडत नाही: नेहरा
शानदार पुनरागमन करणारा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराचे वय आणि त्याचे संघातील स्थान यावर काही जणांकडून टीका करण्यात येत आहे. ‘मला लय सापडण्यासाठी फक्त एक मॅचही पुरेशी असते.’ असे उत्तर आशिष नेहराने आपल्या टीकाकारांना दिले आहे. नेहरानं इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात लागोपाठ दोन चेंडूंवर दोन गडी बाद केले. दरम्यान, यानंतर बोलताना नेहरा म्हणाला की, ‘मी वनडे खेळत असू किंवा टी-20 माझ्या सरावात काहीच कमरतता नसते. मला लय प्राप्त होण्यासाठी फक्त एक सामना पुरेसा असतो.’ भारतात झालेल्या टी20 विश्वचषक आणि आयपीएलनंतर नेहरानं दुखापतीमुळे काही काळ विश्रांती घेतली होती. ‘जोवर तुम्ही फिट आहात तोपर्यंत तुम्ही खेळू शकता. त्यामध्ये तुमचे वय आड येऊ शकत नाही.’ असेही नेहरा म्हणाला.