चाळीसगाव येथे ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.रजनीताई पवार यांचे प्रतिपादन
चाळीसगांव- जगानुसार आपण बदललेच पाहिजे कारण जग बदलायला निघाले तर आपल्याला मनस्ताप होईल त्यातून नैराश्य येईल. त्यापेक्षा तरूणांनो आपण स्वत: बदला आपल्यातला आत्मविश्वास प्रबळ करा, मनावरील ताण वेळीच कमी करून सुंदर आयुष्य जगण्याची कला आत्मसात करा, आत्महत्या करून आपण आपल्याबरोबर आपल्या परिवाराला अडचणीत आणत असून आत्महत्या करणे हा कुठल्याही समस्येवरचा उपाय नसून आपल्या मित्र मैत्रिणीबरोबर खुशाल मोकळा संवाद साधा त्यातून आपल्यात बदल घडवा, असा सल्ला गुरुवारी ‘आय एम पॉझीटीव्ह’ या विविध सामाजिक संस्थांच्या नव्याने स्थापन झालेल्या संघटनेच्या वतीने आयोजित व्याख्यानात प्रा.डॉ.रजनीताई पवार यांनी दिला. शहरात चाळीसगाव महाविद्यालय व नानासाहेब य ना चव्हाण महाविद्यालयात आयोजित व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही
राष्ट्रीय सेवा योजना व आय.एम.पॉझिटिव्ह तथा आपण चाळीसगांवकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय महाविद्यालयात व्याख्यानात डॉ.पवार बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर वसुंधरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या स्मिता बच्छाव, दिव्यांग भगिनींच्या आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी अहोरात्र झटणार्या मिनाक्षी निकम, ज्येष्ठ रंगकर्मी सुनीता घाटे, नानासाहेब यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष
डॉ.रजनी पवार पुढे म्हणाल्या की, तरूणांनो प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा करावाच लागतो. 99 टक्के गोष्टी आपल्याकडे उपलब्ध असतांना एक टक्क्यांसाठी स्वतःच्या आयुष्यात निराशा मोठी करण्यापेक्षा त्याविषयी सकारात्मक निर्णय घ्या. आपल्याला एखाद्याचा राग आला असेल तर त्याच्या तोंडावर बोलून मोकळे व्हा, विचार बदला, जीवन बदला, स्वारी म्हणायला शिका, महागडे गाड्या, वेगवेगळ्या व्यसनाच्या आहारी जाण्यापेक्षा भविष्यात करीअरसाठी मोठी स्पर्धा आहे त्यासाठी स्वत:ला तयार करा,असे सांगून त्यांनी अब्राहमलिंकन ते सचिन तेंडूलकर अशा विविध नामवंत व्यक्तींच्या जीवनात केलेला संघर्ष महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर उभा केला. अतिशय ओघवत्या शैलीत त्यांनी विद्यार्थ्यांकडून आय एम पॉझिटिव्हचा पुनरुच्चार करून घेतला
मनमोकळेपणाने बोला : स्मिता बच्छाव
यावेळी स्मिता बच्छाव यांनी मनोगत व्यक्त करीत सांगितले की शरीराचे सर्व अवयव विज्ञानामुळे दुरूस्त होवू शकतात मात्र मन दुरुस्त होऊ शकत नाही स्वत:च आपले मन दुरूस्त करावे लागते. भरपूर व्यायाम करावा, तरूणांनी मनमोकळेपणाने बोला, जवळच्या मित्रांजवळ संवाद साधा, तुम्ही एक पाऊल पुढे टाकले तर तुमच्या पुढे कुणीच जाणार नाही, असे त्या म्हणाल्या.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास राज्य औद्योगिक वसाहतीचे संचालक संजय पवार, संयोजक सचिन पवार, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, अजय जोशी, राजू छाजेड, प्रकाश कुलकर्णी, जलसाक्षरदुत स्वप्नील कोतकर, स्वप्नील धामणे, शरद पाटील, शीघ्र कवी रमेश पोतदार, स्वीमिंग क्लबचे अध्यक्ष समकीत छाजेड,सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील, आशुतोष खैरनार, देवेन पाटील, प्रा.यु.पी.शिरसाठ, प्रा.सुनिल निकम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख ए.एस.महाजन यांनी तर सुत्रसंचालन ए.एल.सूर्यवंशी यांनी केले.
चाळीसगाव महाविद्यालयात तोबा गर्दी
सकाळी नऊ वाजता चाळीसगाव येथील धुळे रोड वरील महाविद्यालयात व्याख्यानाचे पाहिले पुष्प डॉ.प्रा.रजनी पवार यांनी गुंफले. यावेळी व्यासपीठावर चाळीसगाव एज्युकेशनचे सचिव डॉ विनोद कोतकर, आय.एम.ए.च्या माजी अध्यक्ष डॉ.उज्वला देवरे, स्मिता बच्छाव उपस्थित होत्या. यावेळी प्राचार्य मिलिंद बिल्दींकर प्रास्तविक केले तर प्रा.रवी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सचिव डॉ.विनोद कोतकर यांनी शिक्षणासोबत आध्यत्मिक शिक्षणाची गरज निर्माण झाली असून अध्यात्माचा आ म्हणजे आपणापासून सुरुवात करा, असा होतो. आजच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांमध्ये आलेले नैराश्य दूर होण्यास मदत होईल आणि आयुष्याबद्दल सकारात्मक परीणाम दिसून येतील, असे ते म्हणाले. प्रा.डॉ.रजनीताई पवार यांचा यावेळी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गर्दीने जमनादास मेहता सभागृह फुल्ल भरले होते.