पिंपरी-चिंचवड : मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात र्हास होत आहे. त्यामुळे सजीवसृष्टी धोक्यात येत आहे. पर्यावरणाचा र्हास थांबावा, यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. याच उद्देशाने जडी-बुटी दिनानिमित्त विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठानच्या वतीने प्रभाग क्रमांक आठ, इंद्रायणीनगर परिसरात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत संपूर्ण प्रभागात सुमारे एक हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत. या मोहिमेचे उद्घाटन महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्च्युत हांगे, सचिन लांडगे, पतंजलीचे राज्य प्रभारी बापू पाडाळकर, नगरसेवक विलास मडिगेरी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
स्पाईनरोडच्या दोन्ही बाजूने रोपण
चार ऑगस्ट हा दिवस देशभरामध्ये जडी-बुटी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त महापालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य व नगरसेवक विलास मडिगेरी यांच्या संकल्पनेतून प्रभागात लोकोपयोगी व आयुर्वेदिक स्वरुपाची एक हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार 380 झाडे स्पाईनरोडच्या दोन्ही बाजूने उड्डाणपुलापर्यंत लावण्यात आली. एक व दोन वर्ष वयाची चार ते पाच फुटांची 380 झाडे प्रभागातील स्पाईनरोड परिसरात अनेक ठिकाणी लावण्यात आली. तर उर्वरित 620 झाडे चार ते पाच दिवसात लावण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान, पंताजली योग समिती, वृक्ष मित्र संघठना, सायकल मित्र संघटना व महापालिका उद्यान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. या कार्यक्रमावेळी शिवलिंग ढवळेश्वर, अनिल पोखर्णीकर, वसंत पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पर्यावरणाचा समतोल गरजेचा
यावेळी महापौर नितीन काळजे म्हणाले की, शहरातील पर्यावरण जपणे ही काळाजी गरज आहे. त्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागातील पर्यावरणाचा समतोल राखण्याची जबाबदारी उचलली पाहिजे. तरच शहराचा पर्यावरण समतोल राखण्यास मदत होणार आहे. यासाठी मडिगेरी यांच्या उपक्रमाची दखल इतरांनीही घेणे आवश्यक आहे, असे मत महापौर काळजे यांनी व्यक्त केले.
देशी वृक्षांचे लागवड होणार
विलास मडिगेरी म्हणाले की, वृक्ष लावणे सोपे आहे; परंतु, त्यांचे संगोपन करणे कठीण काम आहे. प्रभागात सर्व देशी प्रकारची म्हणजेच कडूनिंब, पळस, अर्जुन, बेल, करंज, आपटा, कांचनर, बेहडा, जांबूळ, हिरडा, कंदब, आवळा, पिंपळ या लोकोपयोगी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानने या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी उचलली आहे, असे त्यांनी सांगितले.