डेंग्यूने दोन बळी घेतल्यानंतर उपाययोजना न करणाऱ्या नगराध्यक्षांसह मुख्याधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखलची मागणी
भुसावळ : अतिक्रमण धारकांचे पुर्नवसन झालेच पाहिजे, भुसावळ शहरातील पथदिवे सुरूच झालेच पाहिजे, सुरळीत पाणीपुरवठा झालाच पाहिजे, डेंग्यूमुक्त शहर झालेच पाहिजे, नगराध्यक्षांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, नगराध्यक्ष मुर्दाबाद, नही चलेंगी चलेंगी, तानाशाही नहीं चलेंगी यासह विविध घोषणाबाजी देत जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी गुरुवारी प्रांताधिकारी व नगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढून शहरवासीयांचे लक्ष वेधले. शहरात डेंग्यूने कहर केल्यानंतर दोघांचे बळी गेले मात्र त्यानंतरही पालिका प्रशासनाकडून व्यापक उपाययोजना होत नसल्याने जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता त्यानुसार गुरुवारी सकाळी 11.45 वाजता जुन्या पालिका कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. विविध घोषणांचे फलक हाती घेत व घोषणाबाजी करीत शेकडो मोर्चेकरी प्रांताधिकारी कार्यालयावर धडकले व त्यानंतर पालिकेवर मोर्चेकरी धडकल्यानंतर त्यांनी मुख्याधिकार्यांवर प्रश्नांची सरबत्ती करीत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला
जनआधारच्या मोर्चाने वेधले लक्ष
माजी आमदार संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत मोर्चाचे नियोजन करण्यात आले. गुरुवारी सकाळी ठरल्याप्रमाणे जनआधारचे नगरसेवक व नागरीक जुन्या पालिका कार्यालयाच्या आवारात जमल्यानंतर सकाळी 11.45 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. वाहतूक कोंडी न होण्यासाठी महिला व पुरूष मोर्चेकर्यांनी दोघांची रांग करीत पालिका प्रशासनाच्या निषेधाचे फलक हाती घेत मोर्चाला सुरुवात केली. मॉडर्न रोड, विठ्ठल मंदिरमार्गे मोर्चेकरी बाजारपेठ पोलिस ठाण्यापर्यंत आल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन यांनी प्रभाग 24 मधील शेकडो नागरीकांना सोबत घेत मोर्चात सहभाग नोंदवला. पायी निघालेल्या मोर्चामुळे बाजारपेठ पोलिस ठाणे व हंबर्डीकर चौकात वाहतूक कोंडी झाली.
प्रांत कार्यालयाबाहेर मोर्चेकर्यांचा ठिय्या
प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चेकरी धडकल्यानंतर प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी निवेदन घेण्यासाठी बाहेर यावे म्हणून मोर्चेकर्यांनी प्रवेशद्वाराबाहेरच ठिय्या मांडला मात्र सात जणांच्या शिष्टमंडळाने येवून चर्चा करावी, असा निरोप प्रांतांनी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्याकरवी पाठवल्यानंतर मोर्चेकरी तयार झाल्यानंतर त्यांनी प्रांतांचे दालन गाठले तर अन्य मोर्चेकर्यांना प्रवेशद्वारावरच पोलिस बंदोबस्त लावून अडवण्यात आल्याने त्यांनी जागीच शिष्टमंडळ येईपर्यंत ठिय्या मांडला.
तर पुन्हा बळी गेल्यास मृतदेह पालिकेत आणणार
पालिकेचे गटनेता उल्हास पगारे यांनी संतप्त होत आठ दिवसांपूर्वी निवेदन दिल्यानंतर काय उपाययोजना केल्या याबाबत जाब विचारला तर नगरसेवक संतोष दाढी, माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर, आशिक खान, प्रदीप देशमुख यांच्यासह अनेकांनी प्रभागात फवारणी होत नाही, अस्वच्छतेने नागरीक त्रस्त आहेत, दोन नागरीकांचा बळी गेल्यानंतर पालिका प्रशासन उपाययोजना करीत नाही, अवघ्या एका धुरळणी मशीनवर काम भागणार कसे? असा संतप्त सवाल उपस्थित करीत यापुढे नागरीकांचा बळी गेल्यास मृतदेह पालिकेत आणण्याचा इशारा देण्यात आला तर या संदर्भात प्रांतांनी गांभीर्याने दखल न घेतल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला.
पालिकेकडून उपाययोजना होत नसताना मात्र लाखोंची बिले दर महिन्याला न चुकता निघत असून त्यातून मुख्याधिकार्यांना मोठ्या प्रमाणावर टक्केवारी मिळत असल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, प्रांतांनी मोर्चेकर्यांच्या शिष्टमंडळाला पालिका डेंग्यू प्रतिबंधासाठी धुरळणी करण्याच्या नियोजनाबाबत पत्र देण्याचे आश्वासन दिले.
पालिकेत मुख्याधिकार्यांपुढे मोर्चेकर्यांचा संताप
प्रांत कार्यालयातून निवेदन दिल्यानंतर मोर्चेकरी पालिका कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच पालिकेच्या प्रवेशद्वारावर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला तर मोजक्याच पदाधिकार्यांना आतमध्ये सोडण्यात आले. मुख्याधिकार्यांचे दालन गाठल्यानंतर प्रमुख पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने प्रश्नांची सरबत्ती करीत मुख्याधिकार्यांपुढे संताप व्यक्त केला. तुम्ही किती नगरसेवकांना ओळखता, किती प्रभागांना आतापर्यंत भेटी दिल्या, पालिकेच्या दवाखान्यात डॉक्टर नाही, बॅटरीच्या उजेडात प्रसुती करावी लागते, शवविच्छेदन होत नाही आदी समस्यांचे गार्हाणे मांडण्यात आले. पालिकेकडे धुरळणी यंत्र घेण्यासाठी पैसे नसल्यास आम्ही लोकवर्गणी करून पैसे पुरवू, असे सांगून नगरसेवकांनी संताप व्यक्त करताना पालिकेत दर महिन्याला कोट्यवधींची बिले निघतात मात्र सीओ टक्केवारी स्वीकारण्यात मग्न असल्याचा आरोप करीत पालिकेने रस्त्यांच्या डागडूजीसाठी मुरूम मागवल्यानंतर त्याचा काही नगरसेवकांनी साठा केल्याचा आरोपही करण्यात आला तर मध्यंतरी वृक्ष लागवडीसाठी आलेल्या वृक्षांची अक्षरशः लूट करून काहींनी शेतात तर काहींनी फार्म हाऊसवर झाडे लावण्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. आम्हीदेखील विरोधी नगरसेवक आहोत, जनतेने आम्हालाही निवडून दिले असून आम्हालाही मान-सन्मान हवा की नको? किती बैठकांसाठी आम्हाला विश्वासात बोलावून विचारात घेण्यात आले? असा सवालही उपस्थित करण्यात आला.
मुख्याधिकाऱ्यांना पालिकेत येण्यास पाडले भाग
प्रांताधिकार्यांच्या दालनात बैठकीसाठी आलेल्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांना पाहताच मोर्चेकर्यातील शिष्टमंडळाचा संताप अनावर झाला. त्यांनी मुख्याधिकार्यांना पालिकेत येण्यास सांगत तेथेच निवेदन देणार असल्याचा पवित्रा घेता मात्र डहाळे यांनी येथेच निवेदन द्यावे, असे सांगताच पदाधिकारी संतप्त झाले व त्यांनी हे तुमचे कार्यालय नाही, तुम्ही कार्यालयात थांबत नाही, नगरसेवकांचे फोन घेत नाहीत त्यामुळे पालिका कार्यालयात येवून निवेदन स्वीकारावे अन्यथा मोर्चेकरी पालिकेत ठिय्या मांडतील, असा पवित्रा घेतल्यानंतर मोर्चेकर्यांच्या आधी डहाळे या पालिकेत पोहोचल्या.
यांचा मोर्चात सहभाग
जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास पगारे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात संतोष (दाढी) चौधरी, नितीन धांडे, आशिक खान शेरखान, जाकीर सरदार, साबीर शेख, माजी नगरसेवक ललित मराठे, दुर्गेश ठाकूर, प्रदीप देशमुख, प्रकाश निकम, मुन्ना सोनवणे, सुदाम सोनवणे यांच्यासह शहरातील शेकडो स्त्री-पुरूष नागरीक सहभागी झाले होते.
अशा आहेत मागण्या
पालिका मुख्याधिकारी व प्रांतांना दिलेल्या निवेदनानुसार, शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून डेंग्यूने थैमा घातल्यानंतर पालिका दखल घेत नसल्याने आक्रोश मोर्चा काढणे भाग आहे. रेल्वे उत्तर वॉर्डातील अतिक्रमण धारकांचे पुर्नवसन करावे, डॉ.आंबेडकर मार्गाच्या बाजूला असलली दुकाने हटवल्याने रेल्वे प्रशासनाच्या अधिकार्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून रस्ता खुला करावा, डेंग्यूत मृत झालेल्या नागरीकांच्या वारसांना पालिकेने दहा लाखांची भरपाई द्यावी, नगरपालिका दवाखान्यात औषधांचा पूरेसा साठा करावा, मुबलक पाणी होवूही शहराला 15 ते 20 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने तातडीने नियोजन करावे तसेच वाढत्या अतिक्रमणाबाबत पायबंद घालावा, अडीच कोटी खर्चातून लावण्यात आलेले पथदिवे बंद असल्याने दोषी नगराध्यक्ष व ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करावा, दोषी ठेकेदाराविरुद्ध कारवाई करावी, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा तसेच नियमित गटारींसह नाल्यांची स्वच्छता करावी व खड्ड्यांमुळे जे लोक मृत्यूमुखी पडले त्यांच्या वारसांना दहा लाखांची मदत देण्यासह जखमींना उपचारासाठी पाच लाखांची मदत द्यावी, सर्व समस्यांना नगराध्यक्ष व मुख्याधिकारी जवाबदार असल्याने त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.