जनकल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहचवा

0

चाळीसगाव । प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बळावर भाजपने पालिका व पंचायत समितीत सत्ता स्थापन केली. या सत्तेच्या लाभ शहरासह तालुक्यातील एक लाख नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन आमदार उन्मेष पाटील यांनी केले. शहरातील भूषण मंगल कार्यालयात बुधवारी 5 रोजी भारतीय जनता पक्षाच्या तालुका व शहर कार्यकर्त्यांची बैठक झाली या प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. 6 एप्रिल भाजपा स्थापना दिवस साजरा करण्यात येणार आहे याकरीता कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. 6 ते 14 एप्रिल दरम्यान भाजपा स्थापना दिन, पंडित दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्ष व 14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपातर्फे जनकल्याण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

योजनांचा लाभ द्यावा
बैठकी प्रसंगी आमदार पाटील यांनी सांगितले की जुन्या नेत्यांच्या संघर्षातून पक्ष तळागाळापर्यंत पोचला आहे. त्यामुळे नव्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा विचार घरोघरी जाऊन गल्लीपासून दिल्लीपर्यंत असलेल्या सरकारच्या विकासाच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी. पंचायत समितीच्या माध्यमातून गाय गोठा, शौचालये, फळबाग अनुदान, सिंचन विहिरी या सारख्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे. तालुक्याच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध होत असून यापुढेही असाच निधी आणून विकास कामे येणार्‍या काळात केले जाणार असल्याचे आमदारांनी सांगितले.

शेतकरी सुखी पाहिजे
उभ्या जगाचा पोषींदा म्हणून बळीराज्याकडे पाहिले जाते. शेतकर्‍यावरच संपुर्ण अर्थव्यवस्था अवलंबुन आहे. तालुक्यात शेतकरी, शेतमजूर सुखी झाली पाहिजे. तळागाळातील शेवटच्या घटकाचा विकास झाला पाहिजे याकरीता कार्यकर्त्यांनी झटावे, नगरपालिकेत सत्ता परिवर्तन करून खरे तर इतिहास घडला आहे. शहरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी जबाबदारी भाजपच्या कार्यकर्त्यांची आहे. यापुढेही सर्वांनी कंबर कसून काम करण्याचे आदेश देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
भाजपातर्फे जनकल्याण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या नियोजनाकरीता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे होते. माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री एम.के.पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सभापती पोपट भोळे, जिल्हा परिषद सदस्य अनिल गायकवाड, पं. स. सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, पं स सदस्य पियुष साळुंखे घृष्णेश्वर पाटील, राजेंद्र चौधरी, वसंतराव चंदात्रे, नमोताई राठोड, अहिल्याबाई राजपूत, माजी जि.प.सदस्य धर्मा वाघ, प्रा.ए.ओ.पाटील, रोहन सूर्यवंशी, , वंदना मोरे, भाऊसाहेब पाटील, सुभाष पाटील, शेषरावबापू पाटील व पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.