ठाणे । ठाणे महानगरपालिकेसमवेत अनेक सामाजिक संघटनांनी ध्वनीप्रदूषणाबाबत जनजागृती करुनही यंदा ठाण्यातील गणेश विसर्जनात आवाजाची पातळी वाढल्याचेच दिसून आले आहे. ठाण्यात अनेक ठिकाणी आवाजाची पातळी 100 डेसीबलच्यावर गेल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी प्रशासनाने कारवाई केली असली तरीही त्यातुलनेत अनेक गणेश मंडळांना अभय मिळाले आहे. ध्वनीप्रदूषणांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येवूनही किरकोळ कारवाई करण्यात आल्यामुळे पोलिसाच्या कारवाईविषयी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
डॉल्बी सिस्टीम केली जप्त, अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन
खोपट येथील साहिल हॉस्पीटल, लाईफ लाईन हॉस्पीटल येथे तीन मिरवणुकांनी डॉल्बी आणि फटाके यामुळं अत्युच्च ध्वनी प्रदुषण केले. नौपाडा पोलीसांनी यापैकी एका मंडळाची डॉल्बी सिस्टीम जप्त केली. पण त्या मंडळाने नंतर बेंजोची व्यवस्था केली. त्याचाही आवाज 100 डेसिबलच्या वर होता. तर रस्त्याच्या दुसर्या बाजूला राबोडी पोलीस तक्रार करून देखील फिरकले नाहीत. या मोहिमेत मंगेश खातू, रोहित जोशी, राजीव दत्ता, सुब्रतो भट्टाचार्य, अनुप प्रजापती, श्वेता चटर्जी, मिलिंद महाजन यांनी मेहनत घेऊन 40 पुरावे गोळा केले. सामाजिक कार्यकर्त्यांमुळेही काही ठिकाणी ध्वनीप्रदूषणाला चाप बसल्याचे दिसून आले आहे.
40 तक्रारींची झाली नोंद
ठाणे मतदार जागरण अभियान, ठाणेकर्स आणि म्युस या संस्थेतर्फे ठाण्याच्या विविध भागात ध्वनी प्रदुषणाची तपासणी करण्यात आली. विष्णूनगर, खोपट, जिल्हा रूग्णालय आणि कळवा नाका या परिसरामध्ये आवाजानं 100 डेसीबलची पातळी गाठली होती. ठाणे शहर, कोपरी, चरई, खोपट, कोलबाड, कॅसल मिल नाका आणि कळवा अशा विविध भागातून ध्वनी प्रदुषणाबाबत 40 तक्रारी दाखल झाल्या पण केवळ एकाच ठिकाणी कारवाई झाली. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त करण्यात येत आहे.