नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दल (संयुक्त)मध्ये सद्या दोन गट पडले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत पर्दापण केल्यानंतर पक्षाचे राज्यसभेतील नेते शरद यादव यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची तयारी पूर्ण झाली आहे. यादव यांना पक्षनेतेपदावरून हटविण्यात येण्याबाबतचे पत्र सात खासदारांसह लोकसभेचे दोन खासदार व राष्ट्रीय महासचिव संजय झा यांनी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना दिले आहे. यादव यांच्याऐवजी आरसीपी सिंह यांना नेता करण्याबाबत शिफरस करण्यात आली आहे. राज्यसभेत जनता दलाचे दहा खासदार असून, यापैकी शरद यादवसमर्थक अली अन्वर यांना निलंबित करण्यात आलेले आहे. तर केरळमधील खासदार हे पक्षापासून दूर झालेले आहेत. दरम्यान, नीतीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन रितसर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये प्रवेश केला. यादवांवरील कारवाईने पक्ष दुभंगला आहे.
नीतीशकुमार यांच्याविरुद्ध शरद यादवांची आघाडी
मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी एनडीएत सहभागी होण्याचा पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी अध्यक्ष शरद यादव यांनी तीव्र विरोध केला आहे. सद्या ते बिहारमध्ये जनजागरण यात्रा काढत असून, नीतीशकुमार व अमित शहा यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. नीतीश यांचा निर्णय हा बिहारच्या जनतेची फसवणूक असल्याचा आरोप यादव यांनी केला आहे. दरम्यान, जनता दल (संयुक्त)ने 19 ऑगस्टरोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावलेली असून, यादव यांना पक्षविरोधी कारवायांबद्दल खुलासा मागवलेला आहे. त्यांनी जर या बैठकीकडे पाठ फिरवली तर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत भेट घेतली, यावेळी त्यांनी रितसर एनडीएत प्रवेशही केला. मोदींनी त्यांचे एनडीएत स्वागत केले.
यादवसमर्थकांची हकालपट्टी सुरु!
शरद यादव यांच्यासह त्यांच्या समर्थकांना पक्षातून काढून टाकण्याची कारवाई केली जाणार असल्याने हा पक्ष पुन्हा एकदा दुभंगणार आहे. पक्षात सद्या नीतीशकुमार यांच्यासह शरद यादव यांचे नेतृत्व मानणाराही मोठा वर्ग आहे. दरम्यान, 11 ऑगस्टरोजी यादव यांचे समर्थक व राज्यसभा सदस्य अली अन्वर अन्सारी यांना पक्षाने निलंबित केले असताना, शरद यादव यांनाही राज्यसभेतील नेतेपदावरून हटविण्यासाठी सभापतींना पत्र देऊन नीतीशकुमार यांनी जोरदार दणका दिला आहे. यापूर्वी पक्षाचे महासचिव अरुण श्रीवास्तव यांना हटविण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी गुजरात निवडणुकीत भाजप उमेदवाराला मत न देण्यासाठी आ. छोटूभाई वासवा यांना प्रोत्साहित केले होते. तसेच, पक्षाचा अधिकृत निर्णय कळविला नव्हता, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. यादव यांनाही पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सद्या पक्षात दोन गट पडले असून, ते एकमेकांवर जोरदार कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच या गटांतील वर्चस्वाची लढाई निवडणूक आयोगाकडे पोहोचण्याचे संकेत असून, त्यावरून तामिळनाडूप्रमाणे कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.