अजमेर : जनता ही भाजपाची हायकमांड आहे तर काँग्रेसचे हायकमांड फक्त एक कुटुंब आहे. त्या कुटुंबाभोवती काँग्रेस नेते प्रदक्षिणा घालतात अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केली. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या गौरव यात्रेचा समारोप नरेंद्र मोदींच्या भाषणाने झाला.
नरेंद्र मोदीं भाषणात म्हणाले की, काँग्रेसने देशावर ६० वर्ष राज्य केले. या साठ वर्षात ते अपयशी होतेच पण विरोधी पक्ष म्हणूनही ते फेल ठरले आहेत. काँग्रेसचे नेते कुठल्याही विषयाचा नीट अभ्यास करत नाहीत. मेहनत घेत नाहीत. म्हणून त्यांना खोटयाचा आधार घ्यावा लागतो अशा तिखट शब्दात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचा समाचार घेतला.
मोदींनी आपल्या भाषणातून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. जेव्हा विकासाच्या मुद्याची चर्चा सुरु होते तेव्हा काँग्रेसचे नेत पळ काढतात असा आरोपही मोदींनी केला. काँग्रेसने ६० वर्षात फक्त मतपेटीचे राजकारण केले. आता कुठे देश योग्य दिशेने जातोय. विरोधी पक्षात बसून काही बोलण्याचे स्वातंत्र्य असते. कारण तेव्हा कोणी विचारणारे नसल्याने प्रवास सोपा असतो असे मोदी म्हणाले. माझे सरकार सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय उद्देशाने काम करत आहे. जे मतपेटीचे राजकारण करतात त्यांना हिंदू-मुस्लिम, जातीचा खेळ खेळण्यात मजा येते. फूट पाडा आणि राज्य करा ही त्यांची मानसिकता असते. याउलट आम्ही संपूर्ण समाजाला जोडण्यासाठी काम करत आहोत. असे मोदींनी सांगितले.
मतपेटीचे राजकारण करणारे उद्या सत्तेत बसले तर ते त्यांच्या सोयीनुसार सरकारी व्यवस्था, नोकरशाहीमध्ये फूट पाडणार. त्यांच्या राजकारणामध्ये जे फिट बसणार त्यांनाच पदे दिली जाणार. त्यामुळे नोकरशाहीचे नुकसान होते. मी देशासाठी, जगासाठी भले पंतप्रधान असीन पण भाजपासाठी मी आजही सामान्य कार्यकर्ता आहे. माझ्यावर जेव्हा केव्हा कुठली जबाबदारी सोपवली जाते तेव्हा मी समर्पित वृत्तीने ते काम करण्याचा प्रयत्न करतो असे मोदी म्हणाले. यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या सरकारचे मोदींनी कौतुक केले. प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवण्यासाठी राजस्थान सरकार प्रचंड मेहनत घेत आहे. वसुंधरा राजे यांच्या सरकारने १३ लाख कुटुंबांपर्यंत वीज पोहोचवली आहे असा दावा यावेळी मोदींनी केला.