जनतेचा बकरा झालाय, सरकारची रोजच गटारी!

0

मुंबई:- अच्छे दिन फक्त सरकारी जाहिरातीतूनच दिसत आहेत. बाकी सगळाच आनंदी आनंद आहे असे म्हणत जनतेचा बकरा झाला असून सरकार रोजच गटारी साजरी करत असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सामनामध्ये दिलेल्या मुलाखतीत केली आहे. गटारी वर्षातून एकदाच होते. तो अमावस्येचा दिवस, पण तोसुद्धा सण म्हणून वेगळया पद्धतीने साजरा करणारा आपला समाज आहे; परंतु कारभार म्हणून म्हणाल तर रोजच गटारी चालली आहे. जनतेचाच बकरा झालाय. जनतेच्याच कोंबड्या झाल्यात. रोज त्यांना कापले जातेय, असे घणाघाती टीकास्त्र ठाकरे यांनी सरकावर सोडले आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी जी.एस.टी.पासून नोटाबंदीपर्यंत, चीनपासून कश्मीरपर्यंत आणि कर्जमुक्तीपासून भाजपच्या वर्तणुकीपर्यंत सर्वच प्रश्नांना धारदार उत्तरे देत पुन्हा भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

जीएसटीचा नुसता गोंधळ
ठाकरे यावेळी म्हणाले की, जीएसटी म्हणजे सगळा गोंधळ आहे आणि हा गोंधळ नुसता उगी राहून पाहण्यासारखा नाही. एक दीड वर्षापूर्वी या जीएसटीची चर्चा सुरू झाली तेव्हा शिवसेनाच सर्वात पुढे होती, की जिने या जीएसटीचे फटके काय पडू शकतात ते दाखवून दिले होते. बाकी हा आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सहन करावं की आवाज उठवावा ते पाहावं. गुजरातमधला लहान व्यापारी रस्त्यावर उतरलाय. त्यांना तेथील सरकारने बेदम चोपलंय. जीएसटीमध्ये मी माझ्या मुंबईला वाचवली आणि मुंबईच्या अनुषंगाने इतर २७ महानगरपालिकांनाही त्याचा फायदा झाला. जकातीच्या माध्यमातून त्यांना जो महसूल येत होता तो आपण सुरक्षित ठेवला असल्याचे ठाकरे म्हणाले.

यादी द्या, फसवू नका
शेतकरी कर्जमाफीतील 39 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. ही यादी द्या! फसवू नका! नाही तर ढोल फोडू!, असा इशारा ठाकरे यांनी मुलाखतीत दिला आहे. कर्जमुक्तीचा बोजवारा उडू नये म्हणून शिवसेना आज फक्त ढोल वाजवतेय. उद्या आणखी काही वाजवायला कमी करणार नसल्याचे देखील ते म्हणाले. कर्जमुक्तीची भूमिका आम्ही घेतलीय ती सरकारला अडचणीची आहे म्हणून शेतकऱ्यांचे मरण रोज उघडया डोळयाने पाहत बसायचे काय? असेही ठाकरे म्हणाले.

मोदींवरही साधला निशाणा
आपल्याकडे सगळया बाबींचे केंद्रीकरण करायचे धोरण सुरू आहे. शेवटी ज्याच्या हाती काठी तो गुरं हाकी, हीच जर का आपली राज्यपद्धती असेल तर राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी पंचायत राज खालपर्यंत ही स्वायत्तता दिली होती. आज मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांनी ही स्वायत्तता काढून घेऊन सर्व काही केंद्राच्या हाती ठेवण्याचा सपाटा चालू ठेवला असल्याचे ठाकरे म्हणाले. जो कोणी पंतप्रधान असेल त्याच्याच मर्जीप्रमाणे फक्त राज्यकारभार चालवला जाणार असेल तर आपल्या देशात खरंच लोकशाही आहे काय? लोकांच्या मताला आणि म्हणण्याला काही किंमत आहे काय? मला नेहमीचं असं वाटतंय की, सुधारणा या पाहिजेत. आपण सुधारणावादी असायलाच पाहिजे, पण सुधारणा करताना आणि एक एक निर्णय घेत असताना मध्ये मध्ये थांबून पाहायलाच पाहिजे की, आपण आतापर्यंत जे निर्णय घेतलेत त्याचा उपयोग होतोय का दुरुपयोग होतोय? फायदा होतोय का तोटा होतोय? असे सवाल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत उपस्थित केले आहेत.

चीनकडून भडकविण्याचे काम
उध्दव ठाकरे म्हणाले की, चीनी प्रसारमाध्यमे आणि चीन सरकारकडून भारतातील कट्टर हिंदुराष्ट्रवाद हा भारताला युद्धाकडे ढकलतोय, अशा बातम्या वाचायला मिळाल्या. त्यांचे म्हणणे असे आहे की, भारतात मुसलमानांना भडकविण्याचंचे काम सुरू आहे. मुसलमानांवरील हल्ल्याचं प्रमाण वाढलेले. आहे. मला असं वाटतंय की, आपल्याकडील मुसलमानांना भडकविण्याचा प्रयत्न चीन करतंय का? जे मुसलमान आज शांत आहेत त्यांना पेटवून भडका उडवायचा. मग सीमा अशांत आणि घरातसुद्धा भडका उडालेला अशी दोन्ही पातळयांवर अशांतता माजली तर त्यावेळेला जकात नाक्यांवरील तपासणीचे महत्व कळेल असे ठाकरे म्हणाले.

फक्त जाहिरातीत सुटले प्रश्न
देशात किंवा राज्यांत अच्छे दिन आले आहेत, सगळे प्रश्न सुटले आहे असे वातावरण जाहिरातींमधून निर्माण केले जात असल्याचा आरोपही ठाकरे यांनी लगावला आहे. ठाकरे म्हणाले की. फक्त जाहिराती चाललेल्या आहेत. जाहिरातीत जे काही चाललंय ते सर्व सत्यच आहे असं समजायचं असेल तर आनंदी आनंद आहे. प्रश्न फक्त सरकारी जाहिरातीत सुटलेले दिसतात. प्रत्यक्षात मात काय चालूय ते स्पष्ट दिसत असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची भांडण नाही पण…
यावेळी ठाकरे म्हणाले की, माझं आणि सध्याच्या मुख्यमंत्र्यांचे वैयक्तिक भांडण हे कधी नव्हतंच. माझे आणि त्यांचे खरंच चांगले संबंध आहेत. अनेकदा मी ज्या काही सूचना करतो त्या ते ऐकतातसुद्धा. पण आता जे काय चालले आहे त्यावर मी बोलतोय. ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत असतात, मी राज्यातील जनतेची भूमिका मांडत असतो. फरक हा एवढाच आहे, असे ठाकरे म्हणाले. जनतेसाठी आम्ही विचारलेल्या प्रश्नांची मात्र उत्तरे त्यांना द्यावी लागतील असे ते म्हणाले.

कर्जमुक्तीमध्ये गोंधळच
यावेळी ठाकरे यांनी कर्जमुक्तीमध्ये गोंधळ असल्याचा देखील आरोप केला. त्यांनी सांगितले की, कर्जमुक्त होईपर्यंत शेतकऱयांना तातडीने दहा हजार रुपये द्यायचे होते. ते जेमतेम दोन ते अडीच हजार शेतकऱयांनाच मिळाले आहेत. ही परिस्थिती असेल तर त्यास गोंधळ नाही तर काय म्हणायचं? कर्जमुक्तीच्या बाबतीत म्हणाल तर त्याबाबतच्या स्पष्ट सूचना किंवा पैसे बँकांकडे गेलेले नाहीत. मला विधानसभेत ही ३६ लाख शेतकरी व ८९ लाख शेतकऱयांची नावं पाहिजेत. कर्जमुक्त झालेल्या शेतकऱयांची नावं आम्ही तपासून घेणार असल्याचे देखील ते म्हणाले.