नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची तोंडभरून स्तुती केली. हा अर्थसंकल्प ऐतिहासिक असून देशातील सव्वाशे कोटी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे. त्याचप्रमाणे ’नव भारता’च्या दिशेने वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया मोदी यांनी व्यक्त केली. शेतकर्यांना केंद्रबिंदू ठेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पातून शेतकर्यांचे उत्पन्न वाढणार आहे.
त्यांची आर्थिक स्थिती चांगली होईल. जिल्ह्यांमध्ये कृषी मालांसाठी स्टोरेज, प्रक्रिया केंद्र आणि मार्केटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारने उचललेले हे पाऊल वाखाणण्यासारखे आहे, असे मोदी म्हणाले. देशातील 700 गावांमध्ये 7 हजाराहून अधिक भूखंड आहेत. या भूखंडांवर सुमारे 22 हजार ग्रामीण व्यापार केंद्रांच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. आगामी काळात शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यावर आणि ग्रामीण भारतातील रोजगारनिर्मितीवर भर देणार असल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले.