जनतेच्या हक्कासाठी झेडपी ताब्यात घ्या

0

शेंदुर्णी । आपल्या हक्काच्या योजना शेतकरी आणि सर्वसामान्यांना लाभ मिळावा यासाठी आगामी होणार्‍या जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन माजीमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. शहरातील सोनी जिनिंग कंपनीच्या आवारात जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यामानाने जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. त्यामुळे वळसे पाटील हे बोलत होते.

कार्यकर्ता मेळाव्यात यांची उपस्थिती
यावेळी व्यासपिठावर माजीमंत्री गुलाबराव देवकर, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश पाटील, आमदार सुधीर तांबे, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार अरुण पाटील, रविद्र पाटील, डिंगबर पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष विजयाताई पाटील, कल्पिता पाटील, प्रदिप लोढा, राजमल अग्रवाल, दगडु पाटील व जामनेर तालुक्यातील दोन्ही पक्षाचे पदाधिकारी, आयोजक संजय गरुड, प्रा.शरद पाटील, अजय पाटील उपस्थित होते.

मेळाव्यात उपस्थित आजी-माजी नेत्यांनी कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन
यावेळी आमदार सतीष पाटील यांनी जामनेर तालुक्यातील मंत्र्याच्या शाळेतील मुलांचा शालेय पोषणआहार काळ्या बाजारात विकला जातो व त्याची चौकशीची मागणी खुद्द भाजपच्या जेष्ठ नेत्याने विधानसभेत केल्यावर सुद्धा चौकशी होत नाही, जिल्ह्यासाठी तर सोडा साधे तालुक्यासाठी 1 रुपयाचाही निधी किंवा नवीन प्रकल्प जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन आणु शकले नाही, तसेच गेले तीन वर्षात शेतकर्‍यांना कुठलीही नुकसान भरपाई मिळाली नाही व कवडीमोल भावाने शेतमाल विकावा लागतो, त्यातच नोटबंदीमुळे विकलेल्या मालाचे पैसेही बँकामधुन मिळत नाही म्हणुन वर्षभरात जळगाव जिल्ह्यात 410 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. परंतु सरकार व मंत्री बेफिकीरपणे वागतात, त्यांना धडा शिकवण्याची संधी आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकीने आली असुन त्यात राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस उमेदवारांना निवडून भाजप-सेना युती सरकारला धडा शिकवण्याचे कार्यकर्ते व मतदारांना आवाहन केले.

स्थानिक नेत्यांकडून भाजपावर टिका
गुलाबराव देवकर, अरुण गुजराथी, आमदार सुधीर तांबे, विजयाताई पाटील, संजय गरुड, डिंगबर पाटील यांनी जामनेर तालुक्यातील 7 जिल्हा परीषद 14 पंचायत समिती गणातुन राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस आघाडी उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करतांनाच ना.गिरीश महाजन यांच्या कारभारा वर टिका केली. तसेच नोटबंदी नंतरही नगरपालिका निवडणुकीत वाटण्यासाठी इतका पैसा भाजप युती उमेदवाराकडे कुठुन आला असा सवालही उपस्थीत केला.मेळाव्याचे प्रास्ताविक राष्ट्रवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष प्रा.शरद पाटील तर आभार कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय पाटील यांनी मानले. मेळाव्यात 3000 कार्यकर्ते व शेतकरी उपस्थीत होते.