जनताच माझा पक्ष आहे, निवडणूक लढवण्यावर उदयनराजे ठाम
मुंबई – जनताच माझा पक्ष आहे. जोपर्यंत जनतेला मी निवडणूक लढवावी, असे वाटते तोपर्यंत मी निवडणूक लढवणार, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी आपल्याला पक्षाने उमेदवारी देवो अथवा ना देवो, आपण निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार, असल्याचे सूचित केले. मंगळवारी खासदार उदयनराजे मंत्रालयात आले होते. तेथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही मंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते.
हे देखील वाचा
यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार चाचपणीच्या बैठकीत काही जणांनी उदयनराजे सोडून कोणीही चालेल, अशी भूमिका मांडली. फक्त आडवे करायचेच बाकी ठेवले. हा सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा भाग आहे. पूर्वी राजेशाही होती. राजे कुटुंबातील जे लोक लोकांबरोबर राहिले त्यांना जनतेने भरभरून साथ दिली. जे राजे घराण्यात जन्मले पण जनतेत मिसळले नाहीत, लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. मी प्रचंड मताधिक्याने निवडून आलो. ही लोकांसाठी केलेल्या कामाची पोचपावती आहे. ज्याला कोणाला आपण प्रचंड मताधिक्याने निवडून येणार याची खात्री वाटते, त्यांनी मतांचा आकडा सांगावा. मी स्वतः त्याचा प्रचार करीन. आमदार, मंत्री, खासदार, सर्व पदे भूषविली आहेत. त्यामुळे निवडणूक लढवली पाहिजेच असा माझा आग्रह नाही. पण, लोकांचा आग्रह असला तर मी निवडणूक लढवणार, असे त्यांनी सांगितले.
तेव्हाही कामे होत होती
मुख्यमंत्र्यांबरोब झालेल्या चर्चेत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मतदारसंघातील विविध कामांसाठी मी मंत्रालयात अनेक मंत्र्यांची भेट घेतली. पूर्वीच्या सरकारकडूनही कामे होत होती. या सरकारकडूनही कामे होत आहेत, असेही उदयनराजे म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. पण, जात ही संकल्पना मला कधीच पटली नाही. जातीपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची. कधीतरी याचा विचार करावाच लागेल, असेही ते म्हणाले.