कोरोना विषाणूच्या निमित्ताने जैविक युद्धाची चर्चाही झाली आहे. अमेरिका व चीनचे एकमेकांवर आरोप करून झाले आहेत. या वादात पडण्यापेक्षा कोरोनाच्या आव्हानाशी मिळून सामना करणे अधिक महत्त्वाचे ठरत आहे. भारत ज्या पद्धतीने कोरोनाला अटकाव करण्यासाठी धडपड करत आहे त्याचे जगातून कौतुक होत आहे. सार्क देशांच्या सोबत भारत असल्याचा भरवसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. हा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. लोकांनीही आपल्यावरील जबाबदारीचे भान राखत सरकारला सहकार्य करणे अपेक्षित आहे.
कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. बघता-बघता या विषाणूचा शिरकाव भारतातदेखील झाला. देशात गेल्या आठवड्यापर्यंत दोन जणांचे मृत्यू झाले तर 74 पेक्षा अधिक व्यक्ती बाधित झालेल्या आहेत. याशिवाय तब्बल 40 हजार नागरिक हे केंद्र सरकारच्या निगराणीखाली आहेत. भारतात केवळ सात दिवसांत कोरोना विषाणूने जो हाहाकार उडवला आहे तो लक्षात घेता केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे या आपत्तीचा सामना करण्यासाठी राज्यांना केंद्रीय निधीतून मदत मिळणे सोपे झाले आहे. या विषाणूला अटकाव करण्याचे हरतर्हेने प्रयत्न केले जात असले, तरी या विषाणूला प्रतिबंध करणारी लस अद्यापही उत्पादनाच्या, मानवी शरीरावर वापराच्या पातळीपर्यंत पोहोचलेली नाही. या विषाणूच्या धास्तीमुळे पर्यटन, हॉटेल, एअरलाइन व्यवसाय थंडावला आहे. कोरोनाचा परिणाम क्रीडा क्षेत्रावर देखील पाहायला मिळत आहे. जगभरातील अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. भारतातदेखील बीसीसीआय आणि अन्य संघटनांनी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल रद्दमुळे 10 हजार कोटींचे नुकसान होऊ शकते, असा अंदाज आहे.
आज, अनेकांचे रोजगार संकटात सापडले आहेत. एसटी महांमडळ, रेल्वे, मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवाशांची गर्दी घटली आहे. पोल्ट्री उद्योग मोडीत निघाला आहे. कोंबडीचे मांस खाल्ल्याने कोरोना होत असल्याचा समज जनतेमध्ये पसरला आहे. त्यामुळे कोंबड्या सेल लावून विकण्याची वेळ पोल्ट्रीचालकांवर आली आहे. भरीस भर म्हणजे त्याला बर्ड फ्लूची जोड मिळाली आहे. हा आजार तूर्तास केरळमध्ये असला, तरी त्याचा फैलाव देशात इतरत्र होऊ नये अशीच मनोमन प्रार्थना पोल्ट्री व्यावसायिक करत असतील. कोरोना इफेक्टमुळे शेअर मार्केटमध्ये तर गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे आकडे गेल्या काही दिवसांत ऐकायला मिळाले. हे सत्र केव्हा थांबणार, कोरोना केव्हा सरणार? याचे भाकित वर्तविण्यास डब्लूएचओने (जागतिक आरोग्य संघटना) असर्थता दर्शविली आहे. कोरोनाग्रस्तांचे मृत्यू लक्षात घेता अमेरिका, स्पेनमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनामुळे जगात साडेपाच हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही सरकारी आकडेवारी आहे. काळजी करण्यासारखी घडामोड म्हणजे चीननंतर युरोपात कोरोनाने आपले हातपाय मोठ्या प्रमाणांत पसरले आहेत. चीनच्या वुहान प्रांतात 3 हजार 85 तर त्या खालोखाल एकट्या इटलीमध्ये 1 हजार 441 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाची धास्ती एवढी बसली आहे की, इटलीत शटडाऊन करण्यात आले आहे. या दोनही देशांच्या तुलनेत भारत अधिक सुदैवी म्हणावा लागेल. या विषाणूने चीनमध्ये आपले रागरंग दाखविल्यानंतर त्याचा सामना करण्यास सज्ज होण्यासाठी भारताला बराच वेळ मिळाला. परंतु, कोरोनाला थोपवता आले नाही. सरकार आपल्या पातळीवर सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. देशातील कोरोनाबाधित 11 रुग्ण बरे झाले आहेत. हा विषाणू कसा संपवायचा? ही आताची जगासमोरील चिंता आहे. यातून निभावून निघाल्यानंतर जगाला आर्थिक संकटाशी सामना करावा लागणार आहे. त्याला कोणताच देश अपवाद राहणार नाही. विकसित वा विकसनशील, असा भेदभाव नसेल.
भारतामधील अनेक राज्यांतील शाळा, कॉलेज, मॉल्स, चित्रपटगृहे, स्वीमिंग पूल, जीम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या प्रत्येक आस्थापनेवर अवलंबून असणारे काही लाख कर्मचारी आहेत. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत या स्वरुपाचे आदेश लागू राहणार आहेत. दुर्दैवाने यानंतरही हा बंदी कालावधी वाढवावा लागला तर वर उल्लेखित आस्थापनांच्या कर्मचार्यांच्या वेतनाची व्यवस्था काय असेल? काम नाही तर वेतन कशाचे? असा प्रश्न त्यावेळी उपस्थित होऊ नये. त्याचाही विचार सरकारने आतापासून करायला हवा. कारण, या आस्थापनांमध्ये बहुतेक जण हे रोजंदारी तत्त्वावर काम करणारे आहेत. गोव्यातील अनेक तरुण हे विदेशातील जहाज व क्रूझ कंपन्यांकडे नोकरी करतात. त्यांचाही रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाच आहे. प्रत्येक राज्याची हीच कहाणी कमी-अधिक विस्ताराने सारखीच आहे. आधीच मंदी आणि त्यात कोरोनाचा मार इतका जबरदस्त असणार आहे की, त्यातून उभे राहायला पुढची अनेक वर्षे निघून जातील. संपूर्ण जगभरातून हा विषाणू जेव्हा संपेल तेव्हाच खरे वास्तव चित्र समोर येईल. त्यासाठी अजूनही वर्षभराची तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सरकार आपल्या पातळीवर प्रयत्न करतेय पण त्यांना जनतेमधून प्रतिसादही मिळायला हवा. सरकारने गर्दी होणारे कार्यक्रम टाळावेत, असे आवाहन करूनदेखील काही जणांवर त्याचा फरक पडलेला नाही. लग्न सोहळे, धार्मिक यात्रा दणक्यात होत आहेत. अशा उत्साहींना आणि बेजबाबदार लोकांना कोण आवरणार? त्यांच्यात गांभीर्य केव्हा येणार? सरकारने सक्तीने सर्व काही करावे, ऐकले नाही म्हणून कारवाई करावी, असे या लोकांना अपेक्षित आहे का? या अतिउत्साहाला विरोधाभासी चित्र पाहा की, कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांशी कोणी भेदभाव, दुजाभाव किंवा त्या रुग्णावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाला द्यावा लागला आहे. कोरोना विषाणूच्या निमित्ताने जैविक युद्धाची चर्चाही झाली आहे. अमेरिका व चीनचे एकमेकांवर आरोप करून झाले आहेत. या वादात पडण्यापेक्षा कोरोनाच्या आव्हानाशी मिळून सामना करणे अधिक महत्त्वाचे ठरत आहे. भारत ज्या पद्धतीने कोरोनाला अटकाव करण्यासाठी धडपड करत आहे त्याचे जगातून कौतुक होत आहे. सार्क देशांच्या सोबत भारत असल्याचा भरवसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. हा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. लोकांनीही आपल्यावरील जबाबदारीचे भान राखत सरकारला सहकार्य करणे अपेक्षित आहे.