पुणे : रंगिलो मारो ढोल ना, ढोल बजने लगा तसेच काठी नं घोंगडं घेऊ द्या की रं… अशा गीतांवर थिरकत पुण्यातील शाळकरी मुलांनी विविध नृत्याविष्कार सादर केले. यावेळी गर्दीने ओसंडून वाहणार्या सभागृहातील प्रेक्षक टाळ्या आणि शिट्ट्यांनी उत्स्फुर्त असा प्रतिसाद देत होते. जागरण, गोंधळ, मंगळागौर, बंगाली, गुजराती, उडिसा, आदिवासी असे पारंपरिक नृत्यप्रकार सादर करून बालकलाकारांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. दैनिक जनशक्ति आणि लायन्स क्लब ऑफ पुणे, स्मार्ट सिटी आयोजित जल्लोष 2017 या कार्यक्रमात शहरातील 20 शाळांनी एकत्र येत मंगळवारी खर्या अर्थाने बालदिन साजरा केला.
दुपारपर्यंत बालजल्लोष रंगला
गणेश कला क्रीडा मंडळ सभागृहात सकाळी 10 वाजता सुरू झालेला हा बालदिन नृत्य जल्लोष दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू होता. विजयी व सहभागी झालेल्या स्पर्धकांचा मान्यवरांनी गौरव केला. या आंतरशालेय नृत्य स्पर्धेचे उद्घाटन उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, जनशक्तिचे मुख्यसंपादक कुंदन ढाके यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. जनशक्तिचे व्यवस्थापकीय संचालक किरण चौधरी, सिद्धिविनायक उद्योग समूहाचे संचालक सुनील झांबरे, लायन्स क्लबचे लायन रमेश शहा, सागर पळीवळे, लायन इंद्रजीत डोंगरे तसेच लायन्स क्लबचे पदाधिकारी, अखिल भारतीय मराठी मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आदी याप्रसंगी उपस्थित होते.
‘जनशक्ति’ समाजिक बांधिलकी जपणारे वर्तमानपत्र : डॉ. धेंडे
उद्घाटनपर भाषणात उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, टीआरपी वाढविण्यासाठी माध्यमे विविध मार्ग निवडतात. परंतु, दैनिक जनशक्तिने समाजाशी जोडलेली नाळ कायम ठेवत बालदिनाचे औचित्य साधून बालकांना आनंद देणार्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सामाजिक बांधिलकी जपणारा जनशक्ति म्हणूनच शहरात अल्पावधित लोकप्रिय झाला आहे. यावेळी डॉ. धेंडे यांनी उपस्थित मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.