निलेश झालटे,नागपूर- मंगळवारी विधानसभेत राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावान दुसऱ्याच कविची कविता खपविली होती. ‘जनशक्ती’ मध्ये यासंबंधी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जयंत पाटील यांनी आपल्या ‘हुशारी’चा प्रत्यय दाखवत अनोख्या पद्धतीने या चुकीबद्दल खुलासा विधानसभेत केला. यावेळी ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ या म्हणीप्रमाणे त्यांनी आपली चूक न सांगता भाजपवाल्यांवरच अभ्यास नसल्याची आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे शिष्य राहिले नसल्याची टीका केली.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, ‘काल मी सभागृहात एक कविता प्रस्तुत केली. अटलबिहारी वाजपेयी यांची ती कविता आहे असे मी काल सभागृहात सांगितले, मात्र ही कविता वाजपेयी यांची नसून पुष्पमित्र उपाध्याय यांची आहे. मात्र भाजपच्या एकाही सदस्यांनी त्यावर शब्द उच्चारला नाही. भाजपचे सदस्य परीक्षेत फेल झाले आहेत. दुर्दैवाने अटलबिहारी वाजपेयी यांचे शिष्य भाजपमध्ये राहिले नाही, असा उलटा टोला लगावत आपल्या चुकीचा खुलासा केला.
हे देखील वाचा
यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, जयंत पाटील हे हुशार नेते आहे हे मला माहितीय. आपल्या चुकीचा खुलासा करण्याऐवजी आता ते आमची परीक्षा घेतल्याचं सांगताहेत, असे ते म्हणाले. तसेच प्रदेशाध्यक्ष झाल्यावर हाऊसमध्ये जास्त काम करायचं नसत तर संघटनेसाठी काम करायचं असतं असा सल्ला मला पाटील यांनी दिला होता मात्र ते स्वतः सभागृहात जास्त काम करतात याचा अर्थ त्यांनी विरोधातच बसण्याचे ठरविले आहे असा टोमनाही मारला.
विरोधी पक्षाच्या २९३ प्रस्तावावर बोलत असताना जयंत पाटील यांनी भाषणाची समाप्ती करताना ‘सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयेंगे’ ही कविता म्हटली होती. आणि अटलबिहारी वाजपेयी यांची असल्याचे सांगितले. मात्र ही कविता हिंदीतील प्रसिद्ध कवी पुष्पमित्र उपाध्याय यांची आहे. जयंत पाटील यांच्या या अनोख्या खुलाशानंतर पुन्हा एकदा त्यांच्या हुशारीचा आणि मिश्किलीचा परिचय आल्याची चर्चा सुरू होती.