‘जनसंग्राम’ची नोंदणी रद्द; संस्थेचे प्रमाणपत्र गोठविले

0

जळगाव। घटना व नियमावलीतील तरतुदीनुसार कार्य न करता, संस्थेच्या नाव व नोंदणी प्रमाणपत्राचा गैर वापर करून बनावट सह्यांनी सभासद व पदाधिकारी भासवून बेकायदेशीर कार्य केल्याचा ठपका ठेवत, महाराष्ट्र जनसंग्राम सामाजिक विकास श्रमिक संघटनेची नोंदणी रद्द झाली असून संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र गोठविण्यात आले आहे असे आदेश उपनिबंधक श्रमिक संघ अधिनियम नाशिक विभाग यांनी 24 ऑगस्ट रोजी दिलेल्या निकालपत्राद्वारे दिले असल्याची माहिती अशोक मंडोरे यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.

अर्ज दाखल
जनसंग्राम संघटनेचे अध्यक्ष असलेल्या विवेक ठाकरे यांच्या जनसंग्राम संघटनेच्या मुळ उद्दीष्टांप्रमाणे सभासदांचे हितसंरक्षण न करता बेकायदेशीर कार्य करू, लोकांची फसवणूक केल्यासंदर्भात बीएचआर पतसंस्था ठेवीदार लढा समितीतर्फे दामोदर दाभाडे, जनसंग्रामचे पदाधिकारी उमेश चौधरी, ठेवीदार हितरक्षण तथा पतसंस्था भ्रष्ट्राचार निर्मुलन समितीतर्फे सुधाकर पाटील या अर्जदारांनी विवेक ठाकरे यांच्या विरोधात उपनिबंधक श्रमिक संघ अधिनियम 1926 तथा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे टियुए-1/2017 हा अर्ज दाखल होता.

खुलासा केला नाही
याप्रकरणी उपनिबंधक, तथा सहाय्यक कामगार आयुक्त, नाशिक यांनी अर्जदारांच्या तक्रारीवर योग्य कागदपत्रासह खुलासा सादर करण्याकामी विवेक ठाकरे यांना संघटनेची नोंदणी रद्द करण्यापुर्वी दोन महिने कालावधी तसेच तर नंतर वाढीव नव्याने पुन्हा दोन महिने वाढवून नैसर्गिक संधी देऊनही ठाकरे योग्य तो खुलासा करू शकले नाही. त्यामुळे श्रमिक संघ अधिनियम 1926 चे कलम 10 मधील तरतूदीनुसार उपनिबंधक नाशिक विभाग यांनी जनसंग्राम श्रमिक संघटनेची नोंदणी रद्द करून नोंदणी प्रमाणपत्र एनएसके/जे-1921 काढून घेण्याबाबत न्याय निर्णय दिला आहे. याबाबतची प्रत रजिस्टर पोस्टाने सहाय्यक कामगार आयुक्त, नाशिक येथून अर्जदार सुधाकर पाटील यांना प्राप्त झाली आहे. असे अशोक मंडोरे यांनी कळविले.

आमच्यातील काही ठेवीदारांनी विरोधात जाऊन तक्रारी केल्याने नाशिक कामगार आयुक्त कार्यालयाने आमच्या संघटनेची नोंदणी रद्द केल्याचे समजते. परंतू अद्याप आम्हाला या संदर्भात न्यायालयाकडून अधिकृत आदेश प्राप्त झालेला नाही. असे असले तरीपण जनसंग्राम संघटनेची कागदावरील नोंदणी रद्द झाली असल्यास जनसामान्य व ठेवीदारांच्या मनातील मान्यता कायम आहे. त्यामुळे येत्या 4 सप्टेंबर रोजी राज्यभरातील ठेवीदारांच्या वतीने इशारा आंदोलन होणार आहे. आमचे ठेवीदारांसाठी काम चालुच राहील. भविष्यात कायदेशीररित्या आदेशाच्या विरोधात अपील करण्यात येईल.
विवेक ठाकरे, अध्यक्ष, जनसंग्राम संघटना,जळगाव