जनसंघर्ष यात्रेचे फळ, स्थानिक काँग्रेसींना देईल का बळ? 

0
कुठल्याही राजकीय पक्षांच्या आंदोलनात दोन बाबी ठळक असतात एक म्हणजे सरकारच्या धोरणांचा विरोध व दुसरी म्हणजे त्या पक्षाचे राजकीय सामर्थ्य किती आहे? याचे उत्तर. कॉग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेतील दुसर्‍या टप्प्यातही या दोन बाबी आहेतच. जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा आज फैजपूर येथून प्रारंभ झाला. ही जनसंघर्ष यात्रा सामान्यांच्या प्रश्‍नांवर सरकारच्या धोरणांच्या विरोधात जितकी महत्त्वाची वाटते. तितकीच ती राजकीय दृष्ट्या निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. सरकारवर या यात्रेचा काय परिणाम होईल? हा प्रश्‍न उपस्थित करण्यापेक्षा या यात्रेने जिल्ह्यातील काँग्रेसला नवसंजिवनी मिळेल का? हा प्रश्‍न पक्षाच्या दृष्टीने येथे अधिक महत्त्वाचा असेल….
काँग्रेसचे अस्तित्व हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेस संदर्भातील चर्चा यापुढे जातच नाही, अनेक वर्षांचा कालावधी उलटला तरी काँग्रेसला जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करता येत नसून आगामी काळ ही त्यांच्यासाठी तितका सोयीचा नाही, हे आताचे जिल्ह्यातील राजकीय वातावरण सांगते. आंदोलनाचे नियोजन करूनही अपेक्षित गर्दी न होणे, आंदोलनावर हास्यास्पद टीकाटिपण्णी होणे, शिवाय सरकारविरोधातील आंदोलन हे काँग्रेस पक्षातीलच कमकुवतपणा दर्शविणारे ठरून काँग्रेसवरच उलटते याची प्रचिती या आधीच्या अनेक आंदोलनांमधून आलेली आहे. यामुळे काँग्रेस हा सक्षम पर्याय ठरू शकेल का? या प्रश्‍नाला सर्वसामान्यांचे सहाजिकच नाही हे उत्तर असते, त्यामुळे काँग्रेसची अस्तित्वाची लढाई सुरूच आहे. अर्थात याला पक्षातील मतभेद, कार्यकर्त्यांची कमतरता, सामान्यांपर्यंत पोहचण्यात अपयश, पक्षवाढीसाठी संबधितांकडून कसलेही प्रयत्न नसणे. या बाबी कारणीभूत आहेतच, याव्यतिरिक्त वरिष्ठांना वारंवार जिल्ह्याकडे लक्ष घालावे लागणे हे म्हणजे येथील स्थानिक नेतृत्वच तितके सक्षम नसल्याचे उदाहरण. त्यामुळे जनसंघर्ष यात्रेचा  दुसर्‍या टप्प्यास जिल्ह्यातून प्रारंभ होणे ही बाब स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना महत्त्वाची संधी ठरणार आहे.
लोकसभा विधनसभा एकत्र घेण्याच्या निर्णयावर अजूनतरी ठाम निर्णय झालेला नाही. त्यामुळे संभ्रम कायम आहे. त्यामुळे लोकसभेबरोबरच विधानसभा उमेदवारही कामाला लागल्याचे चित्र जिल्हाभरात पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यात काँग्रेसचा आगामी निवडणुकांच्या दृष्टीने विचार केल्यास माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची लोकसभेसाठी बर्‍यापैकी तयारी सुरू आहे. रावेर मतदारसंघातून काँग्रेसकडून संधी मिळण्याच्या ते प्रतिक्षेत आहे. रूग्णसेेवेमुळे ग्रामीण भागात त्यांच्या नावाचे एक वलय आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर कदाचित या संघर्षयात्रेत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय निवडणुकांच्या कामांना सुरूवात करण्यासाठी ही एक मोठी संधी त्यांना आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत जरी डॉ. उल्हास पाटील अपक्ष लढले होते, तरी गांधी घराण्याच्या अगदी जवळचे नेते म्हणूनही त्यांचा परिचय आहे. त्यामुळे आगामी निवडणूकांमध्ये काँग्रेससाठी उमेदवार म्हणून एक चांगला पर्याय ते असून शकतात. भाजपविरोधात सूर निघत असला तरी जिल्ह्यात मात्र तेवढे भाजपाविरोधी वातावरण नसल्याचे चित्र आहे. कारण नुकत्याच झालेल्या जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक यश मिळविले आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात वातावरण निर्मिती करणे अशक्य असून आपण किती सकारात्मक आहोत हे दाखविणे हाच एकमेव पर्याय विरोधकांकडे असेल. विधानसभेचा विचार केल्यास रावेरसाठी माजी आमदार शिरीष चौधरी सज्ज आहेतच, गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेस राष्ट्रवादी स्वबळावर लढल्याचा त्यांना फटका बसला होता.  आगामी निवडणुकांचे चित्र अजून स्पष्ट नाही. युतीपेक्षा आघाडी होणार याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे काँगे्रसच्या इच्छुांसाठी ही संघर्ष यात्रा म्हणजे त्यांच्या उमेदवारीसाठी मोठी पायरी ठरणार आहे.
 इंधन दरवाढ, सामान्य जनतेचे प्रश्‍न, शेतकरी कर्जमाफी, बेरोजगार युवक, अशा अनेक प्रश्‍नांना हात घालून काँग्रेसने जनसंघर्ष यात्रेचा हा दुसरा टप्पा सुरू केला आहे. त्याची सुरूवात फैजपूर येथून झाली. या मागचे नेमके कारण म्हणजे काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन 1936 साली फैजपूर येथे झाले होेते, काँंग्रेसच्या राजकीय इतिहासात फैजपूरचे ते महत्त्व आहे. त्या पार्श्‍वभूमीवर फैजपुरातून या संघर्ष यात्रेची सुरूवात झाली आहे. काँग्रेसचे जिल्ह्यात उत्तम सुरू आहे म्हणून नव्हे…. त्यामुळे या आयोजना मागचा मुळ उद्देशच मुळात आताच्या स्थानिक काँग्रेसींना आत्मपरिक्षण करायला लावणारा आहे.  संघर्ष यात्रेला वरिष्ठ नेत्यांची मोठी फौज आहे. या नेत्यांनी अनेकदा स्थानिक मतभेदांवरून काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना फटकारले आहे. वरिष्ठ पातळीवरूनही प्रयत्न करूनही काँग्रेसचा हा प्रश्‍न अनुत्तरीत असल्याने आता वरिष्ठांनीही काहीसा हात आखडता घेतला आहे. शिवाय जिल्हाभरात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. भाजपने कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करण्याकडे अधिक लक्ष दिले आहे. त्या मानाने काँग्रेस खुपच मागे आहे. तरी ही संघर्ष यात्रा एक उर्जा निर्माण करण्यात हातभार लावू शकते. या संधीचे सोने कसे करायचे हे काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांच्या हातात आहे. पक्षांतर्गत बदलाचे वारे अनेक दिवसांपासून वाहत आहे. त्या दृष्टीनेही वरिष्ठांना विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. काँग्रेसलाही बदलण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी आहे. उमेदवारांनी तयारी सुरू केलीच आहे, पक्षवाढीसाठीही जोरात प्रयत्न होणे गरजेचे आहे, आंदोलनाचे गांभिर्य, त्याचे परिणाम व त्याचे योग्य नियोजन या गोष्टींच विचारही करणे काँग्रेससाठी महत्त्वाचे आहे. अन्यथा ‘पेट्रोल, डिझेल दरवाढ…झालीच पाहिजे, झालीच पाहिजे’. (सोशल मीडियावरील व्हिडिओ) अशा काहीश्या घोषणांमुळे काँग्रेसचे हसू होईल.. निवडणुका तर दूरच……
आनंद सुरवाडे
 उपसंपादक