वा हतूक खोळंबा (ढीरषषळल गरा) झाली की, वाहतूक पोलिसांना शिव्याशाप देण्यात आपण नुसते धन्यताच मानतो असे नव्हे, तर वाहतूक पोलिसांच्या गलथान कारभारामुळेच हा खोळंबा होतो, असे म्हणण्याइतपत आपली मजल जाते. प्रत्यक्षात ते नसतील, तर शहरातल्या साध्या साध्या गल्ल्यासुद्धा वाहतूक-खोळंब्यामुळे शनिवार-रविवारच्या मुंबई-पुणे महामार्गासारख्या भासायला लागतील (हे केवळ, या खोळंब्यासंदर्भातच होय. ठाणे-मुंबईतल्या शिवसेनेच्या खाबुगिरीच्या कारभारामुळे पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात नव्हे!), हे आपण सोयीस्कररीत्या विसरतो.
तसेच काहीसे आपले नेहमीचे भारतीय हवामान खात्याबद्दल (खचऊ) होते. आपल्या हवामानखात्यावर तोंडसुख घेताना आपण कधी थकत नाही. वसंतराव गोवारीसारख्या महान शास्त्रज्ञांनी अफाट मेहनत घेऊन व अचाट बुद्धी वापरून हवामानाचा व मोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्यासाठी अनेक नवे गुंतागुंतीचे शास्त्रीय मापदंड तयार केले तसेच त्यात अनेकांनी पुढे परिश्रमपूर्वक भर घातली. इस्रोचेही मोठे योगदान आहेच. त्याचे फलस्वरूप म्हणून आपल्या अलीकडील हवामानाच्या व पावसाच्या अंदाजात बर्यापैकी अचूकता येऊनही, आपल्या टीकेच्या रडारवर आपले हवामानखाते कायमचे असते आणि जराही अंदाज चुकला रे चुकला की त्याला झोडपायला मोकळे होतो. मग, सोशल मीडियातून टीकेचा सूरच नव्हे, तर विनोदाचा पूरच वाहायला लागतो. सगळ्यांची रसवंती लागलीच बहरायला लागते! पण, प्रतिकूल परिस्थितीत आज तामीळनाडू, केरळ, लक्षद्वीप येथून सुमारे अडीच हजार कि.मी.चा प्रवास करून आलेल्या ओखी वादळाचा अंदाज अचूक वर्तवल्यानंतर मात्र, चार कौतुकाचे शब्दही आपल्या हवामानखात्याच्या वाट्याला येऊ नयेत, या असंवेदनशीलतेला व बेपर्वाईला काय म्हणावे? कोणी म्हणेल की, ते त्यांचे कामच आहे. पण, आपण हे ध्यानात घेतले पाहिजे की, हवामानखाते म्हणजे काही पोलीसदल नव्हे की, ज्याचे लक्ष्य समोर सुस्पष्ट दिसत असते वा परिस्थितीचा अंदाज सुस्पष्टपणे घेता येणे सहजशक्य असते.
आपल्याला अमेरिकी, युरोपियन हवामान खात्यांच्या अगदी तासागणिक अचूक असणार्या हवामान-अंदाजाचे मोठे अप्रूप असते. पण, हे जाणून घेण्याची आपण कधीच तसदी घेत नाही की, तेथील एकसुरी हवामान आणि भारतीय उपखंडातील अतुलनीय गुंतागुंतीचे हवामान (extremely complex, unparalled and ever changing web of radiating-forces) याची कुठे तुलनाच होऊ शकत नाही. अमेरिकन वा युरोपियन शास्त्रज्ञ वा त्यांची सुपरकॉम्प्युटरसह सगळीच प्रगत शास्त्रीय संसाधने जरी भारतीय हवामान व मोसमी पाऊस वर्तवायला इथे आले, तरीही त्यांनाही इथले अचूक अंदाज वर्तवणे अजिबात शक्य होणे नाही, हे आपल्याला माहीत नसते. भारतात तर अगदी अलीकडच्या काळात भारतीय हवामान अनुसंधान खात्याला डॉप्लर-रडारसारखी अत्याधुनिक संसाधने उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यामुळे याआधीच्या तुलनेत आतातरी अस्मानी संकटांची आगाऊ चाहूल आपल्याला मिळू लागली आहे. याचा अर्थ असा नव्हे की, आपल्या हवामान खात्यात सगळेच आलबेल आहे (तिथेही अनेक लायकी नसलेली माणसे विविध कारणांनी मोठमोठी पदे अडवून बसलेली असतात.) ओखीच्या सध्या झालेल्या नैसर्गिक आपत्तीबाबतीत आमचे म्हणणे एवढेच आहे की, प्रतिकूल परिस्थितीत काम करणार्या आपल्या स्वदेशी मंडळींचेही कधी कौतुक व्हायला हवे. स्वदेशीचे नारे लावत परदेशी नजर लावून बसलेल्या तथाकथित बुद्धिजीवींचे कान उपटण्यासाठीच हा सगळा खटाटोप होय!
– राजन राजे
धर्मराज्य पक्ष, अध्यक्ष
9821064898