शहापूर (जितेंद्र भानुशाली)। शहापूर तालुक्यातील जनसुविधा योजनेतील 28 कामांचा सन 2012-13 सालचा 17 ग्रामपंचायतींना देण्यात येणारा अखर्चीक निधी खर्चिक करण्याची मान्यता नसल्याने पंचायत समितीकडे पडून आहे. हा निधी तातडीने संबंधित ग्रामपंचायतींना अदा करण्यात यावा अशी मागणी भाजपचे तालुका उपाध्यक्ष साजिद शेख यांनी लेखी स्वरूपात केली आहे. याबाबत शहापूर पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि भाजपचे तालुका उपाध्यक्ष साजिद शेख यांनी याबाबत दिलेल्या पत्रानुसार सन 2012-13 ह्या सालामध्ये 17 ग्रामपंच्यातीना जनसुविधा योजनेच्या माध्यमातून 28 कामे मंजूर झाली होती. ह्या कामामध्ये 2 नवीन ग्रामपंचायत इमारत आणि 26 स्मशानभूमी ही मंजूर झालेली कामे ग्रामपंचायतीने करावयाची होती.
मान्यतेच्या निकषामुळे अडचण
17 ग्रामपंचायतींना 28 कामांसाठी 100 टक्के म्हणजे सुमारे 75 ते 80 लाख इतका निधी मंजूर होऊन पंचायत समिती शहापूर यांच्याकडे हा निधी देण्यात आला. त्यावेळी 2012-13 व 2013-14 मध्ये 17 ग्रामपंचायतीना पन्नास टक्के निधी देण्यात आला होता. त्यामुळे 28 कामे सुरू झाली. तर बहुतांशी सर्व कामे पूर्ण झाली. तर कामाचा आणि निधीचा कालावधी दोन वर्षाचा असल्याने व तो उलटल्यामुळे उर्वरीत पन्नास टक्के निधी देण्यास शासनाच्या मान्यतेचा निकष समोर आला आहे.
ग्रामपंचायतींची तारेवरची कसरत
गेल्या चार ते पाच वषार्र्चा कालावधी जाऊनही अद्याप ह्या 17 ग्रामपंचायतींना उर्वरित 50 टक्के सुमारे 40 लाखाचा निधी केवळ शासनाची मान्यता नसल्यामुळे हा निधी आजही पडून आहे. ग्रामपंचायतींनी साहित्य उसनवारी व ज्या मजुरांनी कामे केली. त्यांची मजुरी व उधारी बाकी ठेऊन कामे केल्याची ओरड सुरू आहे.
खासदारांना करणार विनंती
चार वर्ष उलटूनही जनसुविधा योजनेचा 50 टक्के निधी केवळ शहापूर पंचायत समितीला अखर्चीक निधी खर्चिक करण्याची मान्यता नसल्याने हा सुमारे 40 लाखांचा निधी लालफितीत अडकला आहे. खा. कपिल पाटील यांना निवेदन देऊन हा मुद्दा नियोजन समितीच्या बैठकीत प्राधान्याने मांडून सोडवावा अशी मागणी केल्याचे शेख यांनी सांगितले.
याबाबत 2 वर्षात ही कामे न झाल्याने उर्वरित निधी देण्यासाठी शासनाच्या मान्यतेची आवश्यकता असल्याने शहापूर पंचायत समितीने 2014 पासून पाठपुरावा सुरू असून मान्यता अद्याप मिळाली नाही.
– सुशांत पाटील
गट विकास अधिकारी, पंचायत समिती शहापूर