घोरपडी । घोरपडी, मुंढवा आणि कोरेगाव पार्क येथील गणेश मंडळाकरिता जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा 142 गणेश मंडळांनी सहभाग नोंदवला आहे. जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मंडळाचे परीक्षण सुरू करण्यात आले आहे.
तीन वर्षांपासून आयोजित केल्या जाणार्या स्पर्धेमध्ये शेकडो गणेश मंडळे सहभागी होतात. यावर्षी घोरपडी गाव, बी.टी. कवडे रोड, कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरातील मंडळांनी विविध देखावे बनवले आहेत. अनेक मंडळानी सामाजिक संदेशपर देखावे बनवले असून त्यामध्ये ‘बेटी बचाव आणि झाडे लावा, झाडे वाचवा’ तसेच स्वच्छता मोहीम यावर भर दिला आहे. अनेक मंडळानी भव्य-दिव्य मंडप टाकून विद्युतरोषणाई केली आहे.
स्पर्धेमध्ये सुबक आणि सुंदर गणेशमूर्ती, विद्युत रोषणाई व सजावट, हलता देखावा, जनजागृती, जनसेवा देखावा, उत्कृष्ट ढोल-ताशा पथक, आदर्श मंडळ अशा विविध बाबींचा समावेश आहे. विजेता मंडळाला 17 सप्टेंबरला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र खैरे यांनी दिली.