जनसेवा फाउंडेशनच्या सदस्यांनी साजरे केले अनोखे रक्षाबंधन!

0

पिंपरी-चिंचवड : पारंपरिक पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या रक्षाबंधन सणाच्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून त्याच्याकडून आयुष्यभर रक्षणाची ओवाळणे मागते. परंतु, समाजात अशा अनेक बहिणी आहेत की, ज्यांना भाऊ नाही. त्यांच्या मनात रक्षाबंधनाच्या दिवशी काय विचार येत असेल, याची आपण कल्पना करू शकत नाही. त्यामुळे भाऊ नसणार्‍या बहिणींसोबत जनसेवा फाउंडेशनने अनोखे रक्षाबंधन साजरे केले. भाऊ नसणार्‍या बहिणींना जनसेवा फाउंडेशनच्या सदस्यांनी राखी बांधली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.

मुलींच्या चेहर्‍यावर आनंद
जनसेवा फाउंडेशनच्या सदस्यांनी आगळी-वेगळी संकल्पना मांडली. त्यानुसार, अशा काही मुली निवडण्यात आल्या की, ज्यांना भाऊ नाही. तसेच कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ज्यांना खेळण्या-बागडण्याच्या वयातच काही कामे करून कुटुंबाला हातभार लावावा लागतो. अशा सर्व मुलींना एकत्र करून त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन जनसेवा फाउंडेशनच्या सदस्यांनी मुलींना राख्या बांधल्या. या अभिनव उपक्रमामुळे चिमुकल्या मुलींच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज वंजारी, सामाजिक कार्यकर्ते रोहित मोहिते, दिनेश शर्मा व इतर नागरिक उपस्थित होते.

सामाजिक विषयांवर चर्चा
या उपक्रमप्रसंगी जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज वंजारी, सामाजिक कार्यकर्ते रोहित मोहिते व दिनेश शर्मा यांनी विविध सामाजिक विषयांवर चर्चा केली. स्त्री-भू्रणहत्या, हुंडाबळी म्हणजे, भारतीय समाजव्यवस्थेला लागलेली एक प्रकारची कीड आहे. ही कीड मुळापासून नष्ट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बालमजुरी, कुपोषण यासारखे प्रश्‍नदेखील सुटले पाहिजेत. त्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे, अशीही अपेक्षा जनसेवा फाउंडेशनच्या सदस्यांनी व्यक्त केली.