पुणे । क्रीडा भारती व सहकार भारती यांच्या वतीने आयोजित आंतरबँक सहकार करंडक कबड्डी स्पर्धेत जनसेवा सहकारी बँक अ, विद्यासहकारी बँक, संत सोपानकाका सहकारी बँक अ व ब संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्या लढतीत जनसेवा सहकारी बँक अ संघाने पुणे अर्बन बँक संघावर 39-15 अशी मात केली. मध्यंतरालाच जनसेवा बँक संघाने 18-9 अशी आघाडी घेतली होती. यात जनसेवा बँकेकडून श्याम पवारने (10 गुण) उत्कृष्ट चढाया केल्या. पुणे अर्बन बँकेकडून गुरुनाथ मारणे (7) याची लढत एकाकी ठरली. जनसेवा बँकेने पुणे अर्बन बँकेवर तीन लोण चढविले.
दुसर्या उपांत्य लढतीत विद्यासहकारी बँक संघाने कॉसमॉस बँक संघावर 38-16 अशी मात केली. ही लढत अगदीच एकतर्फी झाली. मध्यंतरालाच विद्यासहकारी बँकेने एक लोणच्या जोरावर 20-8 अशी आघाडी घेऊन विजयाचा पाया रचला. विद्यासहकारी बँकेकडून शैलेंद्र वाघने अष्टपैलू खेळ केला. कॉसमॉस बँकेच्या विठ्ठल बोडके याने चांगली लढत दिली.
‘विश्वेश्वर’ची आक्रमक चाल
तिसर्या उपांत्यपूर्व लढतीत संत सोपानकाका सहकारी बँक ब संघाने दी विश्वेश्वर सहकारी बँक संघावर 30-19 अशी मात केली. पूर्वार्धात सोपानकाका बँकेने 22-7 अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात विश्वेश्वर बँक संघाने काही आक्रमक चाली रचल्या, पण त्या संघाला पिछाडी भरून काढण्यात यश आले नाही. सोपानकाका बँकेकडून अक्षय शिंदने (8) उत्कृष्ट चढाया केल्या, तर ओंकार जगतापने (6) उत्कृष्ट पकडी केल्या. विश्वेश्वर बँकेच्या नितीन मोहोळला इतरांची फारशी साथ लाभली नाही. चौथ्या उपांत्यपूर्व लढतीत संत सोपानकाका सहकारी बँक अ संघाने पुणे पिपल्स बँकेवर 34-4 अशी सहज मात केली. निखिल ससारच्या अष्टपैलू खेळासमोर पुणे पिपल्स बँकेचा निभावच लागला नाही. सोपानकाका बँकेने तीन लोण चढविले.