भुसावळ । नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत इतिवृत्त वाचनावरुन गदारोळ करीत मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी जनाधार पार्टीचे गटनेता उल्हास पगारे, नगरसेवक रवि सपकाळे, संतोष त्र्यंबक चौधरी यांच्याविरुध्द बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर गुरुवार 30 रोजी न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. सभेदरम्यान विरोधी पक्षाचे गटनेता उल्हास पगारे, नगरसेवक संतोष (दाढी) चौधरी, रवी सपकाळे यांनी अजेेंड्यावरील विषय वाचन करावे सांगितले असता वाचन न करता सर्व विषयांना मंजूरी देण्यात आली होती.
यावरुन या नगरसेवकांनी मुख्याधिकार्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार झाला होता. यावरुन मुख्याधिकारी बाविस्कर यांनी बाजारपेठ पोलीसात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर फरार असलेल्या तीन नगरसेवकांना शोधून आणण्याकरीता पथकसुध्दा रवाना केले. मात्र दुसर्या दिवशी जिल्हा सत्र न्यायालयाने तिन्ही नगरसेवकांचा तात्पुरता जामिन गुरुवार 30 रोजी न्या. कुळकर्णी यांनी मंजूर केला. आमच्यावर मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष रमण भोळे यांनी खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे 3 रोजी महामोर्चा काढण्यात येईल असे जनाधार पार्टीचे नगरसेवक रवि सपकाळे यांनी सांगितले.