लोणी देवकर येथील रचना खिलार फार्मला भेट : ज्वारी आणि बाजरीची लागवड वाढविण्याची गरज
इंदापूर । पशुधन वाढल्याशिवाय शेती वाढणार नाही. सध्याच्या काळात पशु धन जर वाढवायचे असेल तर, जनावरांना चारा स्वस्त आणि मुबलक प्रमाणात मिळायला हवा. तो जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत पशुधन वाढणार नाही, असे मत राज्य कृषी मुल्य आयोगाध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केले. आज चार्याचा दर 300 रुपये आहे. हे खाद्य खाऊन जनावर 200 रुपयांचे दूध देणार असेल तर कोणीही आपल्या घरी गायी ठेवणार नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्य कृषी मुल्य आयोगाध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केली. इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील रचना खिलार फार्मला त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
जनावरांच्या चार्याचा प्रश्न ऐरणीवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2022 सालापर्यंत देशाचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट पूर्ण करायचे असेल तर सेंद्रीय शेती हा त्याचाच एक भाग आहे. सेंद्रिय शेती ही संपूर्णतः पशुधनावर अवलंबून असते. पशुधन आणि त्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने 10 हजार कोटींचा खर्च अपेक्षीत आहे, असेही त्यांनी सांगितले. पूर्वी 90 टक्केज्वारीचे पिक घेतले जात होते. ज्वारीच्या पेरामुळे जनावरांना चारा उपलब्ध होत होता. आता ज्वारीची लागवड कमी होऊ लागल्याने जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. भविष्यात ज्वारीचा पेराच संपला तर कोण पशुधन ठेवणार नाही, असे पटेल यांनी पुढे सांगितले.
…तर ज्वारी, बाजरीची पेरणी वाढेल
राज्य सरकारने परंपरागत शेती ही संकल्पना पुढे आणली आहे. त्यामुळे जुन्या काळात ज्याप्रकारे शेती केली जायची त्या प्रकारेच शेती करायची आहे. ज्वारी आणि बाजरीचा वापर औद्योगीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वाढल्याशिवाय शेतकरी ते पेरणार नाही. या पिकाचे कारखानदारीत रुपांतर झाले तर नक्कीच शेतकरी ज्वारी आणि बाजरी पेरतील. ही दोन्ही पिके कोरडवाहू असल्याने शेतकर्यांनी त्याची जास्त लागवड करायला हवी.
गोवंश वाढविण्यासाठी प्रयत्नशील
महाराष्ट्रातील 82 टक्के शेती ही कोरडवाहू आहे. या 82 टक्के शेतकर्यांचे उत्पन्न जर वाढवायचे असेल तर, सेंद्रीय शेतीला प्राधान्य द्यायला हवे. या सर्व गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. देशी गोवंश सांभाळायचा असेल तर त्यास आहारसुध्दा देशीच मिळाला पाहीजे. त्याची निगा देशी पध्दतीनेच झाली पाहीजे. त्यासाठी शेतीसुध्दा सेंद्रीय पद्धतीनेच केली पाहीजे. भविष्यात गोवंश वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे ठामपणे पटेल यांनी सांगितले.