मुंबई:- राज्यात जन्मलेली प्रत्येक मुलगी आता पालकांसाठी भाग्य’लक्ष्मी’ ठरणार आहे. प्रत्येक पहिली मुलगी जन्मल्यानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास तिच्या खात्यावर 50 हजार रुपये तर दुसरी मुलगी जन्मल्यानंतर प्रत्येकीच्या खात्यावर 25-25 हजार रुपये फिक्स डिपॉझिट केली जाणार असल्याची माहिती विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. लेक वाचवा, लेक शिकवा तसेच कन्या भ्रूणहत्या रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. मुलींचा जन्म कुठल्याही पालकांना ओझे न वाटता आनंदाने स्वीकारता यावा यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने ‘ माझी कन्या भाग्यश्री’ या विशेष योजनेत सुधारणा करण्यात येणार आहे.
का करावा लागला बदल
महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना 1 एप्रिल 2016 पासून लागू करण्यात आली होती. यासाठी 153 कोटी रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली गेली होती. या रकमेत 200 कोटीपर्यंत वाढ करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत मुलींचा जन्म जन्म झाल्यानंतर 21 हजार 200 रूपये दिले जात होते. 21 एप्रिल 2017 पर्यंत नागरी भागात केवळ 104 तर ग्रामीण भागात 140 लाभार्थ्यांना या योजनेची प्रमाणपत्रे देण्यात आली होती. हे प्रमाण अत्यंत कमी असल्याने या योजनेत बदल केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काय होणार बदल?
– 1 मुलगी झाली आणि ऑपरेशन केले तर 50 हजार रुपये फिक्स डिपॉझिट
– 2 मुली झाल्या आणि ऑपरेशन केले तर प्रत्येक मुलीच्या नावावर 25-25 हजार रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये टाकणार.
– मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर व्याजासह मिळणार रक्कम
– पहिल्या वाढदिवसाला 2500 रुपये मिळणार
– मुलीच्या पहिल्या शिक्षण प्रवेशाला विशेष रक्कम
– मुलींचा जन्मदर वाढलेल्या गावाला 5 लाखांचे बक्षीस
प्राथमिक स्तरावर प्रचार- प्रसार
या योजनेसाठी ग्रामीण तसेच शहरी भागात अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्यांमार्फत माहिती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेच्या अंतर्गत मुलींना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आर्थिक मदत मिळू शकणार आहे. या योजनेमुळे आता जन्मणारी प्रत्येक मुलगी 18 वर्षानंतर लखपती होणार हे मात्र नक्की. मात्र या योजनेची अंमलबजावणी शासन कशा प्रकारे करते यावर रिजल्ट अवलंबून आहे. विशेषतः ग्रामीण भागातील मुलींसाठी ही योजना वरदान साबीत होणार आहे.