जन्मरहस्य – उत्कंठा वाढवणारे, मनोवेधक

0

निसर्गाचा कौल
मातृत्व-पितृत्व हा कौल फक्त निसर्गाचा कौल असतो. येणारा जीव हा पवित्र मानायचा. माणसाच्या जन्माबरोबर त्याला स्वतःचा असा एक वारसा मिळत असतो. हा वारसा जशी जनुके देतात तसेच संस्कारही देतात आणि त्याला आव्हान देणारी परिस्थिती ज्यावेळी निर्माण होते, त्यावेळी त्या व्यक्तीवर मानसिक आघात होतो ती काही काळ खचून जाते, पण पुन्हा परिस्थितीचा सामना करण्यासाठी तोल सावरून उभी राहते त्यावेळच्या संघर्षाची कथा जन्मरहस्य या नाटकात नाट्यपूर्ण रीतीने सादर केली आहे.

माणसाचे मन हे कधीच स्थिर नसते. मनामध्ये अनेक विचार सतत कोणत्या-ना-कोणत्या कारणाने येत असतात. आणि त्याचा संघर्ष हा नेहमीच होत असतो. आयुष्यात कधी-कधी अशा घटना घडतात की, त्यामुळे माणसाचा भावनिक तोल जातो आणि मनामध्ये एक प्रकारचे वादळ काहूर उठते, अशा भावनिक/मानसिक वादळांचा शोध घेणारे नाटक जन्मरहस्य हे रसिकमोहिनी या नाट्य संस्थेच्या निर्मात्या भाग्यश्री देसाई यांनी रंगभूमीवर आणले आहे. लेखन डॉ. आनंद नाडकर्णी यांचे असून दिग्दर्शन कुमार सोहोनी यांचे लाभले आहे. या नाटकात अमिता खोपकर, वसुधा देशपांडे, अजिंक्य दाते, गुरुराज अवधानी, आणि भाग्यश्री देसाई या कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत.जन्मरहस्य या नावातच उत्कंठा आणि रहस्य हे आहे. जन्म-मृत्यू आपल्या हातात नसतो. अपत्य संभव हा निसर्गाचा निर्णय असतो. स्त्री-पुरुषांच्या मनांत अपत्य विषयी इच्छा असो किंवा नसो, जीवाची निर्मिती कधी होणार हे निसर्ग ठरवतो. मातृत्व-पितृत्व हा कौल फक्त निसर्गाचा कौल असतो. येणारा जीव हा पवित्र मानायचा. माणसाच्या जन्माबरोबर त्याला स्वतःचा असा एक वारसा मिळत असतो. हा वारसा जशी जनुके देतात तसेच संस्कारही देतात आणि त्याला आव्हान देणारी परिस्थिती ज्यावेळी निर्माण होते, त्यावेळी त्या व्यक्तीवर मानसिक आघात होतो ती काही काळ खचून जाते पण पुन्हा परिस्थितीचा सामना करण्यासाठी तोल सावरून उभी राहते त्यावेळच्या संघर्षाची कथा जन्मरहस्य या नाटकात नाट्यपूर्ण रीतीने सादर केली आहे.

या नाटकाची कथा ही स्नेहलभोवती फिरते आहे. स्नेहलच्या बाबांचे निधन झाले असून, स्नेहलची आई आणि तिच्या सोबत तिची बहीण इन्नी ह्या स्नेहलकडे राहायला येतात, स्नेहलची आई ही खूप वर्षांपूर्वीपासून एका आजाराने त्रस्त आहे. बाबा असल्यापासून उपचार सुरू आहेत. हा आजार बळावतो त्यावेळी त्यांचा ताबा स्वतःवर राहत नाही. त्या बेफाम होतात. बाबा आईची काळजी घ्यायचे, दामुभावजी हे त्यांचे शेजारी, बाबा नोकरीनिमित्ताने बाहेरगावी जायचे त्यावेळी घरी दामुभावजी असायचे, आता सगळी जबाबदारी स्नेहलकडे आलेली आणि त्याचवेळी तेथे अरुण नावाचा मुलगा येतो, आई त्याच्याकडे पाहते, त्याचा तोंडवळा कोणासारखा आहे याकडे आईचे लक्ष, असेच गप्पा करताना आईचा आजार बळावतो आणि ती स्नेहलला सांगते की तू बाबांची मुलगी नसून दामुभावजी यांची मुलगी आहेस, हे ऐकल्यावर स्नेहलच्या मनावर आघात होतो. तिला समजते की बाबांना डायरी दैनंदिनी लिहिण्याची सवय होती ती सगळ्या डायर्‍या शोधून आणते, ती आपल्या जन्माचे रहस्य नेमके काय आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. दामुभावजी घरी का यायचे? आईला गजरा का आणायचे? बाबांची आणि दामुभावजी यांची मैत्री मान्य केली तरी ते बाबा नसताना आईची विशेष काळजी का घ्यायचे ? बाबांनी विनियोग ही अनाथ मुलांचे संगोपन करणारी संस्था काढण्याचे कारण काय? अशा अनेक भावनिक आणि मानसिक प्रश्नांची उत्तरे जन्मरहस्यमध्ये मिळतील.

स्नेहलची भूमिका भाग्यश्री देसाई ने साकारली असून त्या भूमिकेचे बारीक-सारीक कंगोरे उत्तमपणे सादर केले आहेत. सुरुवातीला सहजपणे वावरणारी स्नेहल जन्माचे रहस्य समजल्यावरची स्नेहल हा मानसिक आणि भावनिक विविध छटांचा प्रवास त्यांनी अप्रतिमपणे पेश केला आहे. अमिता खोपकर ने आईच्या भूमिकेचे बेअरिंग देहबोली आणि संवादमधून उत्तम सांभाळले आहे. गुरुराज अवधानी यांनी बाबांच्या भूमिकेला आणि अजिंक्य दाते यांनी अरुणच्या भूमिकेला योग्य तो न्याय दिला आहे. एकंदरीत जन्मरहस्य हे उत्कंठा वाढवणारे मनोवेधक नाटक आहे.

– दीनानाथ घारपुरे
मनोरंजन प्रतिनिधी
9930112997